कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं. राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्त्व हे सेल्फ मेड आहे. पक्ष बदलल्यानंतर माणसं रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही. तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल, असे वक्तव्य केले नाही.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी शब्दश: शून्यातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. नारायण राणे हे राजकीय व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांचे नेतृत्व आणि कोकणच्या विकासासाठी दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
सतीश पाटणकर
कोकणाच्या जहाल मातीचा गंध असलेला नेता अर्थात नारायणराव राणे हे लोकांमधून आलेले नेतृत्व आहे. गेली काही दशके कानाकोपऱ्यांतल्या माणसाला हे नाव परिचित आहे. नारायण राणे यांच्या नावातच वेगळी छाप आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही मोजकेच नेते आहेत ज्यांनी आपली सुरुवात शून्यातून केली. मात्र जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर स्वतःचे विश्व निर्माण करत त्यांनी सर्वांनाच अवाक् करून सोडले. त्यात राणेसाहेबांचा बराच वरचा क्रम लागतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी शब्दश: शून्यातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. नारायण राणे हे राजकीय व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांचे नेतृत्व आणि कोकणच्या विकासासाठी दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. समाजकारण, राजकारण या क्षेत्रात आज त्यांनी जी उंची कमावली आहे, ती थक्क करणारी आहे. कोकणातल्या जहाल मातीचा वास नारायण राणेंना आहे. नारायण राणेंची खासियत म्हणजे माहिती घेऊन अभ्यासपूर्ण भाषण करणे, नवीन येणारे जे तरुण आमदार आहेत त्यांनी राणेंचा आदर्श घ्यावा. राजकारणातील त्यांचा प्रवेश किंवा त्यांचे आताही सुरू असलेले लोकहिताचे कार्य यामागे व्यक्तिगत स्वार्थाची प्रेरणा कधीच नव्हती.
राजकारण बरेचजण करतात. पण राजकारण हा समाजकारणाचा एक उत्तम मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या कृतीमधून सातत्याने दाखवून दिले आहे. सामाजिक बांधिलकी असा एक शब्द सर्रास वापरला जातो. पण आता तो गुळगुळीत झाला आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी यासाठी सामाजिक सामीलकी असा एक सुंदर शब्दप्रयोग योजला आहे. सामाजिक सामीलकीचे एक उत्तम उदाहरण म्हणून नारायणरावांकडे बोट दाखवावे लागेल, असे माझे प्रामाणिक मत आहे.
माझ्या आतापर्यंतच्या जीवनात अनेक नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क आला. यातील प्रत्येकाची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये माझ्या पाहण्यात आली. राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला आढळलेली स्वभाववैशिष्ट्ये म्हणजे ते आक्रमक आहेत, तेवढेच संयमी आहेत. या दोन्ही गुणांचा समतोल राखणे खरोखरच अवघड आहे. पण त्यांनी ते लीलया जमवले आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना आजच्या काळात हे दोन्ही गुण अंगी बाणवणे, प्रत्येकालाच आवश्यक आहे. पण ते साधतेच असे नाही.
वयाच्या विसाव्या वर्षी एका संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री हा नारायणरावांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोकणातल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राणे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी कोणी तरी बनण्याची, स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविण्याची जिद्द होती. कोकणातल्या प्रथेप्रमाणे तरुणपणीच मुंबई गाठली. परिस्थितीमुळे त्यांना लौकिक शिक्षण फारसे घेता आले नाही. पण भिंतीबाहेरच्या शाळेत ते ज्या गोष्टी शिकले, त्यांनीच त्यांच्या जीवनाला आकार दिला. आक्रमकता, जिद्द, सामाजिक कार्याची आवड, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, संघटन कौशल्य आदी गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात महत्त्वाची पदे स्वकष्टाने मिळविली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकपद, बेस्ट समितीचे अध्यक्षपद, आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली आणि या सर्व पदांना त्यांनी न्याय दिला.
राज्याच्या विधिमंडळात ते १९९० पासून आहेत. या काळात ते त्यांच्या मालवण-कणकवली मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक जिंकले. जुलै २००५ मध्ये शिवसेना सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजविणारा ठरला. याची आपणा साऱ्यांनाच कल्पना आहे. मात्र त्यावेळी आमदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले. एवढेच नाही तर त्यांच्याबरोबर राजीनामा दिलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांनाही त्यांनी निवडून आणले. स्थानिक जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे, याचेच हे निदर्शक आहे. यासाठीच सुरुवातीला मी त्यांचा उल्लेख लोकांमधून आलेला नेता असा केला.
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर अभ्यास आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले आहे. केवळ ओळखले नाही तर त्याचा अंगीकार केला आहे. अभ्यासू वृत्ती हा त्यांचा एक फारसा कोणाला माहीत नसलेला असा अनुकरणीय गुण आहे. विषय कोणताही असो, त्याचा ते सखोल अभ्यास करतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी एक अद्ययावत असे ग्रंथालय आहे आणि रात्री उशिरापर्यंत ते अभ्यासिकेमध्ये व्यस्त असतात. त्यांचा हा गुण खरोखरच सर्वांनी आत्मसात करण्यासारखा आहे.
विधिमंडळातील त्यांची भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण, विविध संदर्भांनी भरलेली असायची. आतापर्यंत त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, उद्योग ही अत्यंत महत्त्वाची खाती स्वकर्तृत्वाने मिळवली आणि उत्तमपणे सांभाळली. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ ही त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्दही अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरली आहे. त्यांच्या कारकिर्दीत राज्यात नव्या औद्योगिक धोरणाने आकार घेतला. नारायणराव राणे या व्यक्तिमत्त्वाबद्दल राज्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबरच प्रत्येकाच्या मनात कुतूहल आहे. राजकारण, समाजकारण, उद्योगाबरोबरच शिक्षणापर्यंत सगळीकडे या माणसाची वट आहे. पण हा माणूस कधी काय करू शकेल कोणीच सांगू शकत नाही. आजच्या राजकारणाच्या धकाधकीतही मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता ही त्यांची दुसरी ओळख आहे. सत्तेत असोत किंवा नसोत, बहुमतात असोत वा नसोत राणे फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेला आहे.
नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक मतं-मतांतरे आहेत. ते प्रभावी आहेत, आक्रमक आहेत. कोकणी माणसाचा हा गूण त्यांच्यातही प्रकर्षाने दिसून येतो. राणे यांचा स्वभाव बाह्यत: आक्रमक, उग्र वाटतो. पण ते त्यांचे केवळ बाह्यरूप आहे. त्यांच्यामध्ये एक धडपड्या कार्यकर्ता, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा नेता, प्रेमळ मित्र, वत्सल पिता आणि कुटुंबवत्सल माणूस लपलेला आहे. त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांना यात कोणतीही अतिशयोक्ती नाही, हे पटेल.
कोकणच्या या सुपुत्राचे आपल्या कोकण भूमीवर नितांत प्रेम आहे. मच्छीमारांचा प्रश्न असो, आंबा बागायतदारांचा प्रश्न असो की, वनसंज्ञा, कबुलायतदार गावकार जमिनींचा प्रश्न असो, ते तो वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडून धसास लावतात. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा आणखी एक गुणविशेष. कोणाचीही भिडभाड न ठेवता आपला मुद्दा तो जोरकसपणे मांडतात आणि त्याची तड लावतात.
महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट करायची, असा त्यांचा एक गुणविशेष आहे. ते तरुण वयात शिवसैनिक होते. बाळासाहेबांबद्दल त्यांना नुसताच आदर नव्हे, तर त्यांची आजही बाळासाहेबांवर कमालीची निष्ठा आहे. राजकारणात मतभेद होतात. पक्ष बदलले जातात; पण आपण ज्या पक्षात होतो, त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याविषयीच्या आत्यंतिक आदराच्या भावना तशाच जपणे, ही काही साधी गोष्ट नाही. कृतघ्न न होणे हा एक आगळा-वेगळा संस्कार आहे.
नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाने विकासाची अनेक कामे सिंधुदुर्गात उभी केली. त्याची यादी खूप मोठी आहे. त्यात इंजिनीअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज झाले आहे, विमानतळ पूर्णावस्थेत आले. एक की दोन नाही, तर किती तरी कामे आहेत. पण या कामांपेक्षाही या व्यक्तिमत्त्वाने ज्ञात-अज्ञात अशा कितीजणांना किती प्रकारे मदत करून आयुष्यात उभे केले आहे, याची गणती नाही. नारायण राणे यांची खासियत म्हणजे उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू देत नाहीत. सहज गप्पांमध्ये एखाद्या वेळी ते अशी माहिती देतात आणि त्या माणसांची नावे सांगतात. योगायोगाने तीच माणसे नेमकी त्यावेळी येतात आणि मग त्यांना ‘दादांचे’ वाटणारे कौतुक, आदर त्यांच्या डोळ्यांतून दिसतो. पण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. राजकारणाच्या धबडग्यात ते कुटुंबाच्या सोबतच एकत्र जेवतात. अनेक मोठी आमंत्रणे असतानाही तिथे नावाला हजेरी लावून सूप घेऊन ते जेवायला घर गाठतात आणि कुटुंबासोबत जेवतात. अगदी मुख्यमंत्री असतानाही भल्याभल्यांची आमंत्रणे नाकारून ते जेवायला घरी पोहोचलेले आहेत.
कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं. राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्त्व हे सेल्फ मेड आहे. पक्ष बदलल्यानंतर माणसं रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही. तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल, असे वक्तव्य केले नाही. शिवसेना सोडल्यानंतर हे सिद्ध झाले की, राणेंचे नेतृत्व पक्षापलीकडले आहे. बेस्टमध्ये किती चेअरमन होऊन गेले मला माहीत नाही. पण मुंबईत बेस्ट चेअरमन म्हणून कुणाची कारकीर्द सर्वात लक्षात राहील, तर नारायण राणेंची. ‘माणूस जेव्हा लढाईत हरतो तेव्हा तो पराभूत होत नाही. पण तो युद्धभूमी सोडून जातो तेव्हा हरतो’, हे वाक्य नारायण राणेंच्या आयुष्यासाठी आहे, आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीने सांभाळली आहे. वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच राजकारणामध्ये अनेक चढउतार येत असतात. नारायणरावांनीही याचा अनुभव घेतलेला आहे. मात्र प्रत्येक प्रसंगातून ते आत्मविश्वासाच्या जोरावर सावरले आहेत. अफाट लोकसंग्रह, जनसेवेची कळकळ, व्यासंग आणि आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर ते यशाची आणखी नवनवी क्षितिजे पादाक्रांत करतील, याची खात्री आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत )