ते राजकीय पटलावर जेवढे आक्रमक आहेत तेवढेच मैत्री, स्नेह यांबाबत आणि आपल्या कुटुंबाबाबतीत अत्यंत हळवेही आहेत. मनमोकळे आहेत. तेवढेच ते शत्रूला नामोहम करेपर्यंत भिडणारे आहेत. मैत्री, स्नेह असो वा राजकारण अथवा राज्याचा कुठलाही प्रश्न असो प्रत्येकाला दिलदार वाटणारे व्यक्तिमत्त्व आहे.
आमदार अॅड. आशीष शेलार
ते कुठल्याही पदावर, कुठल्याही पक्षात असले तरी प्रहार करणारे “प्रहारकरी” आहेत आणि जीवन संघर्षातच त्यांचे यश सामावलेले आहे. संघर्ष हेच त्यांचे जीवन आहे.
वकील म्हणून काम करताना एक पक्षकार म्हणून तसेच राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री म्हणून, विरोधी पक्षनेते आणि आता केंद्रीय मंत्री अशा विविध पदांवर व मी नारायणराव राणे यांना पाहतो आहे. ते ज्या पदावर बसतात त्या पदाला न्याय देतातच. आपल्या कामाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवतातच, हे महाराष्ट्राने पाहिले आहेच. पण सगळ्यात मोठा त्यांचा गुण म्हणजे ते कुठल्याही पक्षात असोत किंवा कुठल्याही पदावर असोत, त्यांच्यात ठासून भरलेला एक “प्रहारकरी” नेहमी दिसतो. जे पटत नाही, जे अन्यायकारक आहे त्याविरोधात थेट बोलायचे, थेट प्रहार करायचा हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे अनेक वेळा त्यांना काही तोटेही सहन करावे लागले असतील. पण दुसरीकडे तेच बिनधास्त बोलणे, वागणे हाच त्यांच्या यशाचाही मार्ग ठरला.
आमच्या कोकणातील मालवणी माणसाचा एक स्वभावधर्म आहे. त्यामध्ये निसर्गदत्त मोकळेपणा, समुद्राच्या लाटेप्रमाणे महाकाय खडकांना भिडत राहणे तसेच शहाळ्या, नारळाप्रमाणे शीतलतापण आहे. कोकणी माणूस भिडस्त आहे. यातील बहुसंख्य गुण नारायण राणे यांच्या स्वभावात पाहायला मिळतात आणि ते स्वाभाविकही आहे. अन्यथा वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे १९६८च्या दरम्यान शिवसेनेच्या युवा संघटनेत आलेला एक सामान्य कुटुंबातील तरुण एवढा मोठा प्रवास करू शकला नसता. त्यांच्या जडण-घडणीत वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. त्यावेळी राजकीय कार्यकर्ता म्हणून झालेला संस्कारही त्यांच्यासोबत अखंड आहे.
आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा एक स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व होते तसेच एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नारायणराव राणे यांचे आहे. ज्या कालखंडत ते राजकीय पटलावर उभे राहिले, त्यावेळी महाराष्ट्रात काही राजकीय घराण्यांचा मोठा प्रभाव आणि दबदबा होता. आजही काही घराणी अशी आहेत. त्यामुळे गोपीनाथराव असो वा नारायणराव राणे असो, यांनी स्वत:सोबत एक घराणे राजकीय पटलावर उभे केले.
नारायणराव राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी अत्यंत अल्पकाळ लाभली. पण त्याही काळात त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. मधल्या काळात उद्योग, महसूल अशी महत्त्वाची खाती सांभाळत असताना त्यांनी त्यांच्या कामातून आपली ओळख निर्माण केली. आज ते केंद्रीय लघू, मध्यम, सूक्ष्म उद्योगमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यशस्वीपणे काम करीत आहेत. या संपूर्ण कालखंडात त्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून कार्यकाळ जनतेच्या विशेष लक्षात राहणारा आहे. त्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेली भाषणे गाजली. वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांनी त्यांची दखल घेतली. स्वभावत: जी आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्या पदावरून त्यांनी अत्यंत जोशात काम केले.
नारायणराव हे चेंबूरसारख्या गरीब वस्तीतून पुढे आले. समाजातील उच्चशिक्षित वर्गातून ते आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्यात किंवा केंद्रात उद्योग मंत्रीसारख्या पदावर काम करताना भाषा, शिक्षण यांसारख्या गोष्टींमुळे मर्यादा येण्याची शक्यता होती. पण त्याही समस्येला बेधडक भिडून ते काम करीत आहेत. समस्येला भिडत राहणे याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून राज्याचा अर्थसंकल्प समजून घेताना कधी अडचण झाली नाही. त्यावरही ते अभ्यासपूर्ण बोलतात अशीच त्यांची ख्याती आहे.
मंत्री म्हणून प्रश्न सोडवताना, निर्णय घेताना बिनधास्तपणा कामी येतो, तो त्यांच्या कामी आला. जनतेमध्ये जाताना समोरची गर्दी खवळलेली असताना त्यांच्यात जाऊन संवाद साधताना हाच बिनधास्तपणा अंगी असावा लागतो. तो नारायणराव राणे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा जनसमुदाय समोर आला तरी त्याला सामोरे जातात. राज्याच्या प्रश्नांची त्यांना पक्की जाण आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ज्ञात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरलेले आहेत. नारायणराव राणे यांच्या राजकीय प्रवासात यश जेवढे मोठे आहे, तेवढे अपयशही त्यांनी पचवले आहे. पण ते अपयशालाही भिडले, त्यांनी अपयशावरही प्रहार करून पुन्हा यश संपादित केले. त्यांचे राजकीय विरोधकही मोठे आहेत. तिथेही त्यांनी सतत भिडत राहून आपले राजकीय पटलावरील यश मिळवले.
नारायणराव राणे यांचे आणि माझे कौटुंबिक स्नेहाचे संबध खरं तर खूप जुने आहेत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी वकिली करीत असताना एका केसमध्ये वकील म्हणूनसुद्धा त्यांना भेटलेलो आहे आणि आमच्या पक्षात ते नव्हते तेव्हा वेगवेगळ्या कारणानेसुद्धा त्यांच्या भेटी झाल्या. तसेच एकाच मातीतील दोन माणसे म्हणूनही अनेक वेळा भेटी झाल्या आहेत. ते राजकीय पटलावर जेवढे आक्रमक आहेत तेवढेच मैत्री, स्नेह याबाबत आणि आपल्या कुटुंबाबाबतीत अत्यंत हळवेही आहेत. मनमोकळे आहेत. तेवढेच ते शत्रूला नामोहम करेपर्यंत भिडणारे, लढणारे आहेत. एका वाक्यात सांगायचे झाले तर मैत्री, स्नेह असो वा राजकारण अथवा राज्याचा कुठलाही प्रश्न अथवा समस्या, प्रत्येकाला दिलदारपणे भिडणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
आज नारायणराव राणे भाजपमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले आहे. देशपातळीवर त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनीही त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. पण ते आपल्या राज्याला, कोकणाला, मालवणला जसे विसरले नाहीत तसाच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरोधातील संघर्षपण संपवलेला नाही. बारीक-सारीक खुसपट काढून नारायण राणे यांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोंडीत पकडण्याचा, प्रसंगी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तेही तेवढ्या ताकदीने त्याही संघर्षात भिडत असून पुरून उरत आहेत. खरं तर नारायण राणे यांच्या समोरचा संघर्ष संपला, विरोधक शांत झाले, तर त्यांच्या संघर्षमय तलवारीला गंज चढेल… पण हेच न कळणाऱ्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या विरोधात संघर्ष सुरू ठेवल्यामुळे नारायण राणे यांची संकटांना भिडणारी संघर्षाची तलवार तळपती आहे.
ते कुठल्याही पदावर, कुठल्याही पक्षात असले तरी प्रहार करणारे “प्रहारकरी” आहेत आणि जीवन संघर्षातच त्यांचे यश सामावलेले आहे. संघर्ष हेच त्यांचे जीवन आहे. कदाचित त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरोधातील संघर्ष संपवला, तर नारायण राणेसाहेबांना झोप येण्यासाठी औषधांचा आधार घ्यावा लागेल. सध्या त्यांच्याविरोधात जे रण पेटवले जात आहे, त्यामुळे सध्या राणे साहेबांना शांत झोप येत असेल. त्यांचे विरोधक सतत खुनशी प्रहार करू पाहत आहेत. त्यामुळे असा संघर्ष त्यांच्याभोवती उभा करून नारायण राणे यांना राजकीय, सामाजिक यश मिळवून देण्यात मोठा वाटा निभावणाऱ्या त्यांच्या कडव्या विरोधकांनाही शुभेच्छा देतो आणि सगळ्या विरोधाला पुरून उरणाऱ्या नारायणराव राणे यांना दीर्घ आयुष्य, यश लाभो अशी कोकणच्या रवळनाथ आणि आई भराडी देवीकडे प्रार्थना करतो.