Thursday, July 10, 2025

माकपच्या महासचिवपदी पुन्हा येचुरी!

माकपच्या महासचिवपदी पुन्हा येचुरी!

कन्नूर (प्रतिनिधी) : देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचा तेविसाव्या माकपच्या अधिवेशनात हाच मूड दिसला, की सीताराम येचुरी यांना पुन्हा महासचिवपदी नेमावे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांची तेविसावी पार्टी काँग्रेस, कन्नूर येथील के. नयनार अकादमीत ६ एप्रिल पासून सुरू आहे. देशभरातून आलेले प्रतिनिधी कॉम्रेड सीताराम येचुरी यांना महासचिव पदी नेमण्याच्या तयारीत दिसले. पूर्वी प्रकाश कारत यांना तीन वेळा महासचिव पदाची संधी दिली होती. ती संधी पुन्हा येचुरी यांना द्यावी, असा कल प्रतिनिधीमध्ये दिसला आहे. येचुरी यांची हिंदी वर चांगली पकड आहे. विरोधी पक्षांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. तसेच केंद्रातील एकाधिकारशाही सरकार विरोधात येचुरी हे विरोधकांची आघाडी उभी करू शकतात.


१२ ऑगस्ट १९५२ ला जन्मलेले येचुरी यांचे शिक्षण, दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून झाले असून त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथून एम. ए. केले आहे. १९७५ मध्ये Phd चे विद्यार्थी असताना, त्यांना आणीबाणीमुळे भूमिगत व्हावे लागले आणि तुरुंगात गेल्यामुळे त्यांना पीएचडीphd पूर्ण करता आली नाही. १९७७ ते १९७८ ते JNU चे अध्यक्ष राहिले. १९७८ मध्ये, एस. एफ. आय SFI विद्यार्थी संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे ते १९८५ मध्ये सदस्य बनले आणि चौदाव्या काँग्रेसमध्ये त्यांची १९९२ ला पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून नेमणूक झाली.


पक्षाचे तत्कालीन महासचिव कॉम्रेड हरकिसंन सिंग सुरजित यांनी देवेगौडा सरकार बनवण्यात पुढाकार घेतला होता तसाच पुढाकार येचुरी यांनी यूपीए-२ यावेळी घेतला आणि पी. चिदंबरम यांच्या सोबत सर्वसंमतीचा कार्यक्रम आखला. त्रिपुरा पश्चिम बंगालमधून डाव्या आघाडीचे सरकार गेल्यापासून पक्षबांधणी या दोन राज्यात पुन्हा उभी राहावी आणि उर्वरित देशात केंद्र सरकार विरोधी मोर्चेबांधणी व्हावी यासाठी सध्यातरी सीताराम येचुरी हेच नाव सर्व संमतीचे होऊ शकते. येचुरी यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा पिनराई विजयन यांचे सरकार सत्तेत आले होते.

Comments
Add Comment