मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या शनिवारच्या (९ एप्रिल) ‘डबलर’ सामन्यांतील पहिल्या लढतीत डी. वाय. पाटील स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्जची गाठ सनरायझर्स हैदराबादशी पडेल. या लढतीद्वारे रवींद्र जडेजा आणि सहकाऱ्यांसमोर पराभवाचा ‘चौकार’ रोखण्याचे आव्हान आहे. नियोजित कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्याने चेन्नईचे कसे होणार, याची चिंता चाहत्यांना होती.
त्यांची चिंता खरी ठरली. माजी विजेता कोलकाता नाइट रायडर्स, पहिलाच हंगाम खेळणारा लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज असे ओळीने तीन पराभव त्यांना पाहावे लागले. जडेजाच्या नेतृत्वाखालील सुपरकिंग्ज आता पराभवाची मालिका रोखतात का, याची उत्कंठा लागून राहिली आहे. केन विल्यमसन आणि सहकाऱ्यांची अवस्था थोडी फार तशीच आहे. त्यांना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून मात खावी लागली. त्यांच्यासमोर पराभवाची मालिका खंडित करण्याचे चॅलेंज आहे.
अनुभवी धोनीसह रॉबिन उथप्पा तसेच नवोदित शिवम दुबेला तीन सामन्यांत प्रत्येकी एकदा पन्नाशी गाठता आली तरी कर्णधार जडेजासह आघाडी फळीतील ऋतुराज गायकवाड, अंबती रायुडू, ड्वायेन ब्राव्हो यांना अद्याप सूर गवसलेला नाही. ब्राव्हो आणि ड्वायेन प्रीटोरियसने थोडी फार अचूक बॉलिंग केली तरी अन्य गोलंदाजांनी निराशा केली आहे. हैदराबादला सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याची गरज आहे. त्यांच्याकडून आयडन मर्करम वगळता कुठल्याही प्रमुख फलंदाजाला हाफ सेंच्युरी मारता आलेली नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठी यांनी थोडा संयम दाखवला; परंतु त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
वेळ : दु. ३.३० वा.