Monday, March 24, 2025
Homeमहत्वाची बातमीबाळासाहेबांची शिवसेना तुम्ही कुठे आणून ठेवली?

बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही कुठे आणून ठेवली?

नारायण राणे यांचा ठाकरेंवर घणाघात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सिने अभिनेत्री कंगना रणौत या त्यांचे घर पाडल्यानंतर म्हणाल्या होत्या, आज मेरा घर टुटा है… एक दिन तुम्हारा घमंड टुटेगा… वक्त पहिया कभी एकजैसा नही रहता… त्यांचे हे म्हणणे आता खरे ठरत आहे. हा नियतीचा खेळ आहे. साहेबांनी शिवसेना कुठे नेऊन ठेवली होती आणि तुम्ही हीच शिवसेना कुठे आणून ठेवली? याचे एकदा आत्मपरीक्षण करा, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री म्हणतात की, आपल्या नातेवाइकांवर सुडाने कारवाई केली जात आहे. हे नातेवाईक काय देवळात चालले होते? त्यांच्यावर कारवाई झाली ती त्यांच्या चुकीच्या कामांमुळे, हेच नातेवाईक उद्या ईडीला कुठपर्यंत आणून ठेवतात ते बघा. आता फास आवळत चालला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कृपेने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. आता आठ तरी येतात का बघा. देवेंद्र फडणवीस काय किंवा किरीट सोमय्या काय, हे एकटे नाहीत. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जगात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेला पक्ष त्यांच्यामागे उभा आहे. भाजपच्या एकाही व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण झाला, तर तुम्हाला भाजपची ताकद काय हे दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सरकार राज्य चालवण्यास असमर्थ आहे. विजेचा तुटवडा येऊ पाहतोय. काही उपाययोजना नाही. फडणवीस यांच्या काळात ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देऊनही विजेच्या तीनही कंपन्या ४७१७ कोटींच्या फायद्यात होत्या. अडीच वर्षे बिन मुख्यमंत्र्यांचे राज्य चालू आहे. अडीच वर्षे मंत्रालयात नाही. अधिवेशनात कधी तरी तोंड दाखवायचे. एसटी कर्मचाऱ्यांचे काय चालले आहे ते बघा. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे धाड पडली. काय काय मिळाले ते तुम्हाला माहीतच आहे. डायरीत कोणाकोणाची नावे आहेत, तेही कळले असेल. मुंबईकरांनी कर भरायचा आणि त्यातून निघालेल्या टेंडरमधले १५ टक्के खायचे, हे काय चालले आहे, असा सवालही नारायण राणे यांनी केला.

संजय राऊत यांचे स्वागत झाले. कशासाठी? संजय राऊत यांनी शिवसेनेबद्दल भाष्य करू नये. ते शिवसेनेचे पगारधारी नेते. सामनाचे संपादक… ते वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. किरीट सोमय्यांवर विक्रांत बोटीसाठी ५८ कोटी जमविल्याचा आरोप केला आहे. वर्गणी काढायची सवय शिवसेनेला. कधी हिशेब दिला का? या सर्वांसाठी गुन्हे दाखल करायचे म्हटले, तर किती गुन्हे दाखल करावे लागतील, असेही राणे म्हणाले.

यांना पत्राचाळीतच रस

केंद्रीय लघू उद्योग मंत्रीपद मिळाल्यानंतर या सरकारला येथे त्याचा उपयोग व्हावा म्हणून दोन पत्रे पाठवली. एकालाही उत्तर मिळाले नाही. यांना पत्रात नाही, तर पत्राचाळीत रस आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्याला मिळालेल्या सूक्ष्म, लघू खात्यावर हे हिणवत होते. मातोश्रीवरचा बॉय हिणवत होता. पण या खात्याला अर्थसंकल्पात किती तरतूद आहे, याची कल्पना आहे का? तब्बल साडेसात लाख कोटी. महाराष्ट्राचे बजेट तरी आहे का? यांचे बजेट चार लाख कोटींचे, तेही हेराफेरी करून. केंद्र सरकारचे तसे नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -