Friday, May 9, 2025

महामुंबई

नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातील प्रभाग रचना अवैध?

नवी मुंबई (प्रतिनिधी): महानगरपालिका व औधोगिक क्षेत्र ही स्वातंत्र्य प्राधिकरणे आहेत.जर एखाद्या प्राधिकरणातीळ काही भाग दुसऱ्या प्राधिकरणात सीमांकन करायचे असेल तर त्यासाठी शासनाकडून तश्या प्रकारचा राजपत्र प्रसिद्ध करणे अत्यावश्यक आहे. परंतु शासनाकडून अशी प्रक्रिया राबविली गेली नाही. तरीदेखील मनपा स्थापन झाल्यानंतर झालेल्या पाच सर्वजनिक निवडणुकां मध्ये एमआयडीसी क्षेत्रातील काही भागाचा अंतर्भाव करत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला.


त्यावर एमआयडीसी मध्ये असलेल्या प्रभाग रचने विषयी काही घटकांनी आक्षेप घेतला व आरटीआय अंतर्गत माहिती मागविली. त्यावेळी एमआयडीसी व पालिकेकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश शासनाकडून निर्गमित झाला नसून एमआयडीसी कडून दिला नसल्याचे लेखी दिले आहे.तसेच नगररचना विभागाने एमआयडीसी प्रशासना सारखीच री ओढली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९४ मध्ये शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले.


त्यामध्ये फक्त सिडकोने विकसित केलेल्या विभागाचा समावेश होता. त्याठिकाणी प्रभाग रचना निर्माण करून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश नमूद करण्यात आले होते. तर दुसरीकडे औधोगिक क्षेत्र हे विशेष नियोजन प्राधिकरण असून त्यांचा समावेश निवडणूक प्रक्रिये साठी करताना ना हरकत परवाना घेणे गरजेचे होते.पण अशा प्रकारची नोंद आजतरी नसल्याचे समोर आले आहे.


राजपत्र काढणे आवश्यक


महानगरपालिका अधिनियम ३ अ कलमानुसार पालिकेसाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात बदल करणे, क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे या प्रक्रियेसाठी शासनाच्या मान्यतेने शासकीय राजपत्र काढणे आवश्यक आहे. पण आज तरी एमआयडीसीमधील क्षेत्र समाविष्ट करण्याचा राजपत्र प्रशासनाकडे नाही.


एमआयडीसी क्षेत्रातील काही भागांचा समावेश निवडणुकी कालावधीकरिता करावा, यासंबंधी कोणतीही माहिती कार्यालयात उपलब्ध नाही.- इ. आर. घरत, जन माहिती अधिकारी तथा क्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी, महापे.


टीटीसी औधोगिक क्षेत्राचा समावेश मनपा प्रभागामध्ये करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र व परवानगी संबंधी माहिती व नास्ती कार्यालयात उपलब्ध नाही. तसेच निरंक आहे. - एस. एच. कळसकर माहिती अधिकारी तथा उप अभियंता,म.औ.वि.म.महापे.


माहिती कायद्याअंतर्गत राजपत्रातील अधिसूचनेच्या प्रतीची छायांकित प्रत माहिती अपेक्षिलेली होती. त्यानुसार कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती संबंधितांना दिली आहे. तसेच ते राजपत्र १९९४ मधील आहे.
- राजेश पवार,जनमाहिती अधिकारी तथा उप अभियंता,पालिका.


एकूण नऊ प्रभागांची निर्मिती...


नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील दिघा पासून ते नेरुळ पर्यंत एकूण नऊ प्रभाग निर्माण केले गेले आहेत. त्यात १,२,३,४,११,२३,२४,३२ व३८ क्रमांकाच्या प्रभागांचा समावेश आहे.


पालिकेने प्रभाग रचना जाहीर करताना एमआयडीसी क्षेत्रातील नऊ प्रभाग जाहीर केले होते. त्यावर मी निवडणूक आयोगाकडे हरकत घेतली होती. तसेच एमआयडीसी, पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती. त्या माहितीमध्ये विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या एमआयडीसीमधील काही क्षेत्र महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत घ्यावयाचे असेल, तर राजपत्र काढला नसल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे एमआयडीसीकडून पालिकेने कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे सिद्ध झाले आहे. याचा अर्थ जे नऊ प्रभागांची निर्मिती केली आहे, ती अवैध आहे.
- मंगेश म्हात्रे, आरटीआय कार्यकर्ता, नवी मुंबई

Comments
Add Comment