बोईसर (वार्ताहर) : गांजा बाळगल्या प्रकरणी बोईसर पोलिसांनी एका ३१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८) पहाटे दोन वाजताच्या सुमारास धनानी नगर येथे करण्यात आली. गणेश स्वामी ऊर्फ अन्ना असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका जागृत पत्रकाराकडे बोईसरमधील धनानीनगर भागात गांजाचा साठा असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झाली होती. यासाठी त्याच क्षणी बोईसर पोलीस ठाण्यासह सर्व अधिकाऱ्यांना संपर्क साधूनही कोणाचाही संपर्क झाला नाही. मात्र, पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतर पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
बोईसर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री केली जात असल्याचे या अगोदरही उघडकीस आले असून याबाबत पत्रकारांच्या मदतीने आणखी एक मोठी कारवाई पोलिसांना करता आली आहे. बोईसर धनानी नगर ड्रीम सिटी येथील एका रहिवासी सदनिकेत व पार्किंगमध्ये असलेल्या स्कुटरच्या डिक्कीमध्ये गांजाचा साठा असल्याची माहिती पत्रकार प्रमोद तिवारी यांना गुरुवारी ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा प्राप्त झाली होती. माहितीचे गांर्भीय लक्षात घेऊन त्यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला. मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यातच बोईसर पोलीस ठाण्याचा फोनदेखील बंद होता.
यासाठी शुक्रवारी पहाटे १ वाजून ३० वाजता पत्रकार तिवारी हे बोईसर पोलीस ठाण्यात गेले, मात्र त्याठिकाणीसुद्धा ठाणे अंमलदार उपस्थित नव्हते. यानंतर त्यांनी लागलीच पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला फोन करून सर्व माहिती दिल्यानंतर धनानी नगर येथील ड्रिम सिटी येथील इमारतीत २ वाजून १५ मिनिटांनी पोलीस हजर झाले व पुढील कारवाई करण्यात आली.
फेब्रुवारी महिन्यांत अशाच एका घटनेत अमली पदार्थाचे सेवन करून एका इसमाने कोयत्याने शेतात काम करत असलेल्या वृद्धाची हत्या केली होती, तर एका महिलेलासुद्धा गंभीर जखमी केले होते. यानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून अमली पदार्थ माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, बोईसर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश कोंडे अधिक तपास करत आहेत.
गांजाची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता
पत्रकारांना मिळालेल्या माहितीनुसार, गांजामाफिया गणेश स्वामी ऊर्फ अन्ना यांच्या स्कुटरच्या डिक्कीमध्ये दोन किलो गांजा व घरामध्ये मोठा साठा असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस ज्यावेळी कारवाईसाठी या ठिकाणी गेले तेव्हा त्यांने साधारण दोन तास दरवाजा उघडला नाही. याच वेळेत त्यांने शौचालयात गांजाची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दृष्टीनेही तपास पोलिसांनी करायला हवा.
अमली पदार्थ रॅकेटच्या मुळापर्यंत तपास करण्याची गरज
गांजामाफिया गणेश स्वामी ऊर्फ अन्ना याने आपल्या मोबाइलवरून इतरही अमली पदार्थ माफियांना संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली आहे. यातच बोईसर पोलिसांनी गांजा माफिया गणेश स्वामीचा फोन ताब्यात घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा घटनेमध्ये अनेकदा मुळापर्यंत जाऊन बोईसमध्ये तपास झाल्याचे आजवर कधी दिसून आले नाही. यामुळे या अमली पदार्थ रॅकेटमध्ये मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची गरज असून बोईसर पोलीस या माफियांच्या मोबाईलच्या आधारे कोणाकोणाला ताब्यात घेतात याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
पोलिसांच्या सखोल तपासाला यश
गांजामाफिया गणेश स्वामी ऊर्फ अन्ना यांचा दरवाजा पोलिसांनी वाजवला असतानाही साधारण २ तास त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर इमारतीमधील इतर लोक जागे झाल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. त्यावेळी पोलिसांनी झाडाझडती घेतल्यावर सुरुवातीला त्याच्या खोलीत काही आढळून आले नाही. मात्र पोलिसांनी अधिक तपास घेत शौचालयाची तपासणी केली असता प्लॅश टँकमध्ये ९०० ग्रॅम गांजा सापडला. तसेच इमारतीमध्ये उभ्या असलेल्या स्कुटरच्या डिक्कीमध्ये सुमारे २ किलो पेक्षा अधिक असा एकूण साधारण ३ किलो गांजाचा साठा आढळून आला आहे.