नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतमधील बार्डी गावातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर असलेली गळतीमुळे बार्डी गावात पाणी पोहोचत नाही. दरम्यान, नवीन नळपाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत असून ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. चिंचवली, भाणसोली आणि बार्डी गावासाठी २० वर्षांपूर्वी नळपाणी तयार करण्यात आली होती. उल्हासनदीवर आंबिवली येथून आणले जाणारे पाणी चिंचवली येथे रेल्वे फाटकाच्या बाजूला असलेल्या जलकुंभात पाणी आणले जायचे.
मात्र ते जलकुंभही पाण्याच्या गळतीमुळे बंद करण्यात आले असून ग्रामस्थांना आता थेट नदीवरून जलवाहिनीतून सार्वजनिक स्टँड पोस्टवर पोहोचवले जाते आणि स्थानिक ग्रामस्थ तेथे पिण्याचे पाणी भरतात. या नळपाणी योजनेचे पाणी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्डी गावात जलवाहिनीमधून पोहोचवले जाते. मात्र २० वर्षे जुन्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर असलेली गळती यामुळे बार्डी गावात पाणी पोहोचतच नाही. बार्डी गावाला चार इंच व्यासाच्या जलवाहिनीमधून पाणी पोहोचते. १६० घरांची वस्ती असलेल्या बार्डी गावात सहा ठिकाणी सार्वजनिक स्टँडपोस्ट असून त्या ठिकाणी महिला पिण्याचे पाणी घरी घेऊन जात असतात. त्यात बार्डी गावाच्या अलीकडे नव्याने निर्माण झालेल्या गृहसंकुलात २००च्या आसपास कुटुंबे राहायला आली आहेत.
त्या भागाला जलवाहिनी टाकण्यात आल्याने गावात पाण्याची आणखी पाणीटंचाई निर्माण झाली. बार्डी गावात सहा ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्टँड पोस्टवर पूर्वी दररोज आळीपाळीने अर्धा तास पाणी सोडले जायचे. मात्र गेले काही महिने बार्डी गावातील ग्रामस्थांना अगदी अल्प प्रमाणात पाणी पोहोचत असून ग्रामस्थ या पाणीटंचाईने महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चिंचवलीपासून बार्डी गावाकडे येणारी जलवाहिनी तसेच चिंचवली भागातील जलवाहिनी यावर असलेल्या गळतीमुळे सर्व भागांत पिण्याचे पाणी पोहोचत नाही. पाण्याच्या नेहमीच्या समस्येमुळे बार्डी गावातील महिलांना गावाच्या बाहेरून जाणाऱ्या उल्हास नदीवर हांडे घेऊन पाणी आणायला जावे लागत आहे.
ग्रामपंचायतची नळपाणी योजना जुनी असून जलवाहिनीमधून काही ठिकाणी आणि व्हॉल्वमधून पाण्याची गळती सुरू आहे. मात्र दुरुस्ती करायला ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध नसल्याने जलवाहिनीची दुरुस्ती करता येत नाही. नवीन नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतचा प्रस्ताव प्रलंबित असून शासनाने चिंचवली, बार्डी गावाची नळपाणी योजना मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे.
– हरिचंद्र निर्गुडा, ग्रामविकास अधिकारी, चिंचवली ग्रामपंचायत