ठाणे (प्रतिनिधी) : रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नो पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग, नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेवारस, नादुरूस्त व अपघातग्रस्त वाहनांवर ही धडक कारवाई करण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत वाहने लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने अनधिकृतपणे उभी होती. सदरच्या जुन्या, नादुरूस्त-भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत होता तसेच सकाळी व सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सदरच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते.
त्यास अनुसरून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या एकूण ९ दोन चाकी, ३ चार चाकी व ८ तीन चाकी भंगार वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी वाहतुक विभागाचे पोलिस व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने केली. यापुढे रस्त्यांवरील जुन्या, नादुरूस्त, भंगार वाहनांवर तसेच नो पार्किंगमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई करणार असल्याचेही अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.