उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांची नावे ही मला पंकज त्रिलोकानी हा पुरवत असल्याचे अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीने न्यायालयासमोर सांगितल्यानंतर आता भाजपने थेट कलानी कुटुंबाला लक्ष्य केले आहे. कलानी हे व्यापाऱ्यांचे मसीहा असल्याचे भासवतात, मात्र प्रत्यक्षात ते लुटेरे असल्याचा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत हा विषय पेटणार असल्याची शहरभर चर्चा रंगली आहे.
उल्हासनगर कॅम्प २ मधील नालंदा पॅलेस या इमारतीत अमित वाधवा(४४) हा व्यावसायिक राहत असून तो कल्पतरू को.ऑप.क्रेडिट सोसायटी या पतपेढीचा चेअरमन सुद्धा आहे. या पतपेढीतून आरोपी रोशन माखीजा, उमेश राजपाल, पंकज तिलोकानी, सुशील उदासी यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज माफ व्हावे म्हणून आरोपींनी अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याच्याशी संगनमत केले होते. जानेवारी ते एप्रिल या कालखंडात सुरेश पुजारी हा वेगवेगळ्या मोबाईलवरून वाधवा याच्याशी संपर्क साधून १ करोडची खंडणी दे अन्यथा रोशन माखीजा व अन्य कर्जदारांचे कर्ज माफ कर अन्यथा तुला ठार करणार अशी धमकी सुरेश पुजारी देत होता.
या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरेश पुजारी, रोशन माखीजा, उमेश राजपाल, पंकज तिलोकानी, सुशील उदासी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी खंडणीखोर सुरेश पुजारीला ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपाईन्स देशात अटक करण्यात आली. त्यानंतर भारतात आणण्यात आले असून सद्या ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सुरेश पुजारीचा ताबा आहे. दोन दिवसांपूर्वी खंडणी विरोधी पथकाने सुरेशला उल्हासनगर न्यायालयात आणले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी थेट सुरेश पुजारीला याबाबत विचारले असता सुरेशने थेट पंकज त्रिलोकानी हा माहिती पुरवत असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंकज त्रिलोकानी हा कलानी समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहे. हेच साधत भाजपचे आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी, प्रवक्ता प्रदिप रामचंदानी, अमित वाधवा यांनी पत्रकार परिषद घेत कलानी कुटुंबाला लक्ष्य केले. उल्हासनगरच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे कलानी कुटुंबाने केले आहे, टीओके मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा सहभाग आहे. ओमी कलानी आणि सुरेश पुजारी यांचा संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी केला आहे.