Tuesday, April 29, 2025

महामुंबईपालघर

तारापूरचा पर्यावरणपूरक प्रकल्प रखडला

तारापूरचा पर्यावरणपूरक प्रकल्प रखडला

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रियायुक्त सांडपाणी जलवाहिनीद्वारे खोल समुद्रात सोडण्याची योजना प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे रेंगाळली आहे. दुसरीकडे उद्योजकांच्या संस्थेने ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे जलवाहिनी टाकण्यांसदर्भात विरोध कायम ठेवला आहे. त्यामुळेही प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सध्या नवापूर समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे २५०-३०० मीटर खोलीवर सोडण्यात येत आहे. त्यापैकी बहुतेक सांडपाणी भरतीदरम्यान खाडीक्षेत्रात शिरत असल्याने तज्ज्ञ पर्यावरण संस्थांच्या सल्ल्यानुसार हे सांडपाणी समुद्रात ७.१ किलोमीटर अंतरावर सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जलवाहिनी समुद्रतळावर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी एकत्र करून ब्रेक प्रेशर टँकपासून (बीपीटी) समुद्र किनाऱ्यापर्यंत ३.२ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही प्रमाणात विलंब झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील एका मोकळ्या जागेत साठवलेल्या एचडीपीई जलवाहिनीला कोरोना काळात आग लागून नुकसान झाल्याने या वाहिन्या नव्याने मागवाव्या लागल्या. जमिनीखालील भागात औद्योगिक वसाहतीच्या बीपीटी टाकीपासून नवापूर पोलीस चौकीपर्यंत लांबीच्या दोन किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नवापूर खाडी क्षेत्रात जलवाहिनी टाकण्यासाठी काम प्रलंबित आहे.

नवापूर गावातील ज्या शेतकऱ्यांच्या भागातून ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जागेचा मोबदला देण्याच्या दृष्टीने जमिनीची मोजणी होणे आवश्यक आहे. अतितातडीची मोजणी करण्यासाठी अर्ज तालुका भूमी अभिलेख कार्यालय देण्यात आला आहे. मोजणी झाल्यानंतर संबंधित जागा मालकांचा देण्यात येणारा मोबदला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवण्यात येऊन नंतर जागा मालकांना पैसे अदा केल्यानंतर काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment