नाशिक (प्रतिनिधी) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरासाठी भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. १० ते १६ एप्रिलदरम्यान सप्तश्रृंगीदेवीच्या चैत्रोत्सवात देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. सप्तश्रृंगी देवी ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. चैत्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात.
गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. त्यात मागील २ वर्षे कोरोनामुळे भाविकांना चैत्रोत्सव साजरा करता आलेला नसल्याने यंदा भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याबरोबरच आलेल्या सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, तर भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी जाणाऱ्या आणि मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्गाचे नियोजन करण्यात आले असून निगराणीसाठी २५३ क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.