मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली असून शुक्रवारी शेवटचा पेपर पार पडला. ही परीक्षा घेताना कोरोना महामारी आणि एसटी महामंडळाचे संप अशा दोन अडचणी विद्यार्थ्यांसमोर होत्या मात्र या दोन्ही संकटावर मात करत विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आली आहे. ही परीक्षा ऑनलाइन घ्यावी म्हणून विद्यार्थ्यांनी रान पेटविले होते मात्र कोणताही वाद निर्माण न होता परीक्षा सुरळीतपणे पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाचे आभार मानले आहे.
राज्यात कोरोना महामारीचे संकट कायम असतांना बारावीची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे शिक्षणमंत्री यांनी निर्णय घेतला होता. शिक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थी भडकले होते आणि त्यांनी शिक्षणमंत्री यांच्या घराबाहेर मोठा आंदोलनदेखील केला होता. मात्र अशी सर्व परिस्थिती असताना देखील बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहत परीक्षा घेतली. कोरोना आणि विद्यार्थ्यांचे बंड अशी दोन संकट राज्य सरकारसमोर होते मात्र या दोन्ही परिस्थितीवर मात करत ही बारावीची यशस्वीपणे पार पडली.
शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, राज्यमंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी योग्य नियोजन करून व सातत्याने आढावा बैठका घेऊन तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहित करून ही आव्हानात्मक परीक्षा कोणतेही गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडली. मुंबई विभागीय स्तरावर विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी यांनीही सर्व मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवला आणि वेळोवेळी प्रोत्साहन दिले, त्यामुळे ही कामगिरी पार पाडण्यात आम्ही यशस्वी असल्याचे बोर्डाच्या मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ. सुभाष बोरसे यावेळी म्हणाले.