Wednesday, July 17, 2024
Homeदेशऑनलाइन गेमिंगचं वाढतं व्यसन, कंपन्यांमुळे माणसाचं मानसिक आरोग्य धोक्यात

ऑनलाइन गेमिंगचं वाढतं व्यसन, कंपन्यांमुळे माणसाचं मानसिक आरोग्य धोक्यात

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. कोरोनाकाळात वेळ घालवण्यासाठी अनेकांनी गेमिंग अॅपचा आधार घेतला. मात्र ऑनलाइन गेमिंग फक्त विरंगुळ्याचं साधन राहिलं नसून अनेकांना त्याचं व्यसन जडलं आहे. ऑनलाइन गेम्स माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवत असून कंपन्या नफा कमावण्यासाठी लोकांचं मानसिक आरोग्य धोक्यात आणत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे माणसाच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल होत असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत.

ऑनलाइन गेमिंगमधली आव्हानं पूर्ण करताना माणसाला आनंद मिळू लागतो. गेम खेळत असताना मानवी मेंदूत डोपामाईन हे रसायन स्रवायला सुरुवात होते. या रसायनामुळे आनंदाची अनुभूती मिळू लागते आणि मन ऑनलाइन गेमिंगकडे ओढलं जातं. शरीर वारंवार डोपामाईनची मागणी करू लागतं आणि मग गेम खेळून शरीराची ही मागणी पूर्ण केली जाते. कालांतराने माणासाला गेम खेळल्याशिवाय चैन पडत नाही आणि मग गेम खेळण्याचं व्यसन जडतं.

माणसाला गेमिंगचं व्यसन लागावं यासाठी कंपन्या पद्धतशीरपणे योजना आखत असल्याचं एका गेम डिझायनरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. सॉफ्टवेअर तयार करण्याआधी कंपनी मानसिक विज्ञान तसंच सामाजिक सिद्धांतांचा अभ्यास करते. कोणतंही गेमिंग अॅप मोबाइलसाठी नाही तर मानवी मेंदूचा विचार करून तयार केलं जातं. यालच परसुएसिव्ह डिझाइन म्हणजेच मेंदूला उत्तेजित करणारं डिझाइन असं म्हटलं जातं. याच कारणामुळे मोबाइल गेम एकदा खेळल्यानंतर वारंवार खेळावासा वाटतो.

ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. एकटेपणा, चिडचिड, अस्वस्थता, लोकांमध्ये न मिसळणं, मन एकाग्र न होणं अशा अनेक समस्या भेडसावू लागतात. आज मोबाइलवर गेम्स खेळणाऱ्या लहान मुलांची संख्या खूप मोठी आहे. ही गेमिंग अॅप्स मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम करत आहेत. सतत गेम्स खेळणारी मुलं आभासी जगात रमू लागतात. त्यांना तेच जग आपलंसं वाटू लागतं. ही मुलं वास्तवापासून फारकत घेतात. त्यामुळे मुलांना ऑनलाइन गेम्सपासून शक्य तितकं लांब ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

टाळेबंदीच्या काळात मोबाइल गेमिंग अॅपची बाजारपेठ झपाट्याने विस्तारली. आजही या बाजारपेठेचा आवाका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मोबाइल गेमिंग उद्योगाने समाज माध्यमांनाही मागे टाकलं आहे. बोस्टन कंसल्टिंग ग्रूप ऑफ सिकोईयाच्या अहवालानुसार भारतात जवळपास ३० कोटी लोक ऑनलाईन गेम्स खेळतात. २०१९-२० या वर्षात ऑनलाईन गेमिंगची बाजारपेठ ३८ टक्क्यांनी विस्तारली. २०२३ पर्यंत ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ पाच अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. इन मोबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार महिलाही मोठ्या प्रमाणावर मोबाइल गेम खेळत आहेत. भारतात ४३ टक्के महिला गेमिंग अॅप्सचा वापर करत असल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. यापैकी बारा टक्के महिला २५ ते ४४ या वयोगटातल्या आहेत. लाईमलाईट नेटवर्कच्या सर्वेक्षणानुुसार भारतीय आठवड्यातले जवळपास नऊ तास मोबाईल गेम खेळण्यात वाया घालवतात.

मोबाइल गेम्सचं व्यसन दूर करता येतं. यासाठी गेम खेळण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करायला हवी. तसंच गेम खेळण्याऐवजी अन्य कामांमध्ये मन गुंतवायला हवं. चांगले छंद जोपासून ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापासून मुक्ती मिळवता येऊ शकते, असं
तज्ज्ञ सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -