पुणे (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील पहिले तिन्ही सामने गमावलेला मुंबई इंडियन्सचा संघ अद्याप पहिल्या विजयाच्या शोधातच आहे. दिल्ली, राजस्थान आणि कोलकाता यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेल्या मुंबईसमोर शनिवारी तगड्या बंगळूरुचे आव्हान आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबईला अद्याप यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे तीन सामन्यांनंतरही मुंबईच्या गुणांची पाटी अद्याप कोरीच आहे. पुण्याच्या स्टेडियममध्ये रंगणाऱ्या सामन्यात शनिवारी मुंबईला बंगळूरुशी दोन हात करायचे आहेत.
यंदाच्या हंगामातील मुंबईचा आतापर्यंतचा प्रवास निराशाजनकच राहीला आहे. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा, इशन किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांना धावा काढण्यात यश येत आहे. पण त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे जमलेले नाही. उर्वरित फलंदाज मात्र निराशाच करत आहेत. त्यामुळे ठराविक फलंदाज वगळता मुंबईचे अन्य फलंदाजांनी नाराजच केले आहे. मुंबईला बंगळूरुविरुद्ध विजय साकारायचा असेल, तर फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. बसील थंपी, मुरुगन अश्वीन, जसप्रीत बुमरा यांनाही गोलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही.
एक सामना चांगली कामगिरी केली म्हणून दुसऱ्या सामन्यात त्या गोलंदाजावर भरवसा ठेवावा, असा विचार केला, तर दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाज महागडा ठरत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचीही अडचण वाढत आहे. डॅनियल सॅम्स, तायमल मिल्स हे गोलंदाज महागडे ठरत आहेत. अष्टपैलू पोलार्डलाही आतापर्यंत लक्षवेधी खेळ करता आलेला नाही. ही सारी मरगळ मुंबईच्या खेळाडूंना झटकावी लागणार आहे. दुसरीकडे बंगळूरुने पंजाबविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करत कोलकाता आणि राजस्थानला पाणी पाजले. त्यामुळे बंगळूरुचा संघ सलग तिसऱ्या विजयाची नोंद करण्यासाठी उत्सुक आहे.
नेतृत्वपदाची खांदेपालट बंगळूरुला फळली असल्याचे दिसते. कर्णधार फाफ डु प्लेसीस नेतृत्वासह फलंदाजीची जबाबदारी समर्थपणे झेलत आहे. नेतृत्वाचे दडपण गेल्याने विराटही खुलून फलंदाजी करत आहे. अनुभवी दिनेश कार्तिक त्यांच्या जोडीला आहे. गोलंदाजीत हर्षल पटेल प्रभावी कामगिरी करत आहे. पंजाबविरुद्धचा सामना गमावला असला तरी बंगळूरुने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता, हेही नसे थोडके.
वेळ : रात्री ७.३० वा. ठिकाण : पुणे