Tuesday, May 20, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

महाराष्ट्र उद्योग धंद्यामध्ये अग्रेसर - छगन भुजबळ

महाराष्ट्र उद्योग धंद्यामध्ये अग्रेसर - छगन भुजबळ

नाशिक (हिं.स.) : महाराष्ट्र उद्योग धंद्याच्या बाबतीत देशात अग्रेसर असून यामध्ये ज्येष्ठ उद्योजकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ‘ग्रीकल्चर ही संस्था उद्योग धंद्या क्षेत्रातील मसिहा आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योगाला अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर'' उत्तर महाराष्ट्र शाखा सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित सोहळा राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या कालिदास कलामंदिर सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी गंगाधरण डी., मनपा आयुक्त रमेश पवार यांच्यासह व्यापारी, उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये उड्डाणपूल,अंतर्बाह्य रिंग रोड, चौपदरी रस्त्यांचे जाळे, विमानतळ, पर्यटनाच्या सुविधा यासह पायाभूत सुविधांचा विकास आपण केला असून कनेक्टिव्हिटी निर्माण केली आहे. मुंबई पुण्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक आहे हे सर्वमान्य झाले आहे. नाशिकला अतिशय उत्तम असे वातावरण लाभले असून नाशिकमध्ये पर्यावरण पूरक उद्योग यावेत यासाठी प्रयत्न आहे. मुंबई पुण्यात ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, राज्यातील विजेच संकट महाराष्ट्र राज्यासमोर उभ असून त्यासाठी काल स्वतंत्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या संकटामुळे महाग वीज आपल्याला घ्यावी लागणार आहे. या घेतलेल्या विजेचा बोजा शेतकरी आणि उद्योजकांवर पडणार नाही याची दक्षता शासनाने घेतलेली आहे. एक खिडकी योजना अतिशय उत्तम रित्या राबविली जाईल यासाठी प्रशासनाने अधिक काळजी घेऊन योजना यशस्वीपणे राबविण्यात यावी असे भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment