
वाडा (वार्ताहर) : दिवसेंदिवस वाढणारी महागाई व वाढती बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पालघर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड माधव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. ८ एप्रिल) वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.
तालुकाध्यक्ष सुनील पाटील तालुका उपाध्यक्ष बबन चौधरी विनायक पाटील, मंगेश मोकाशी, जगदीश मोकाशी, विनोद तरे, दिनेश भगत, साक्षी पाटील, मनीषा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू दूध तेल पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर सर्वकाही महागल्याने सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनता त्रस्त झाली आहे. महागाईचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पालघर जिल्हा अध्यक्ष कॉ. माधव चौधरी यांनी सांगितले.