मुंबई (प्रतिनिधी) : सलामीवीर शुबमन गीलच्या (९६ धावा) आणि कर्णधार हार्दीक पंड्याच्या (२७ धावा) अप्रतिम फलंदाजीवर गुजरात पंजाबविरुद्धचा सामना विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र त्यांच्या अवेळी बाद होण्याने गुजरातचा विजय अशक्यप्राय झाला होता. राहुल तेवतियाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर अप्रतिम षटकार ठोकून घशातून हिरावून घेतलेला विजयाचा घास गुजरातला मिळवून दिला. या विजयासह १५ व्या हंगामातील पहिले तिन्ही सामने जिंकणारा गुजरात हा पहिला संघ ठरला आहे.
पंजाबच्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड स्वस्तात परतला. त्यानंतर शुबमन गील आणि साई सुदर्शन या जोडीने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. शुबमनने पंजाबच्या गोलंदाजांना धु धु धुतले. साई सुदर्शनने ३० चेंडूंत ३५ धावा केल्या. साई सुदर्शनन बाद झाल्यावर हार्दिक पंड्याने शुबमनला चांगली साथ दिली. सामना निर्णायक क्षणी असताना शुबमन बाद झाला. त्याने ५९ चेंडूंत ९६ धावा केल्या. त्यानंतर मात्र धावा करणाऱ्या हार्दीकला दुसऱ्या बाजूने साथच मिळली नाही.
१८ चेंडूंत २७ धावा करत गुजरातच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवणारा कर्णधार हार्दीक धावचीत झाला आणि गुजरातच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले असे वाटत होते. शेवटी २ चेंडूंवर अप्रतिम षटकार ठोकून राहुल तेवतीयाने अशक्यप्राय वाटणारे असे विजयी लक्ष्य संघाला गाठून दिले. तत्पूर्वी पंजाबची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या ११ असताना कर्णधार मयांक अगरवालच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसला.
त्यानंतर जॉनी बेअरस्टोलाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. अवघ्या ३४ धावांवर त्यांचे २ फलंदाज माघारी परतले होते. शिखर धवन आणि लिअम लिव्हींगस्टोन या जोडीने पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला. धवनने (३० चेंडूंत ३५ धावांची) संयमी खेळी केली. लिअम लिव्हींगस्टोन पंजाबसाठी देवासारखा धाऊन आला. त्याने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर २७ चेंडूंत ६४ धावांची मोठी खेळी केली.