नदीपात्रात हजारो मासे मृत
गौसखान पठाण
सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी अंबा नदी व या नदीच्या पाण्यावर जगणारे सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील याच अंबा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. त्यामुळे जांभुळपाडा ग्रांमस्थांमध्ये घबराट पसरली आहे. हे मासे नक्की कोणत्या कारणाने मेले आहेत, यावर उलटसुलट चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.
शुक्रवारी दि. (८ रोजी) रात्री वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अंबा नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारण्याचा प्रकार केला असल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या अघोरी प्रकारामुळे अंबा नदीपात्रातील जांभुळपाडा येथे मृत मासे आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या अंबानदीच्या पात्रात ठरावीक कालावधीनंतर नेहमीच अशा प्रकारे मृत मासे नदीत आढळून येत असल्यामुळे येत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तसेच नदीतील पाणीही दूषित होत आहे. याच आंबा नदीपात्रातील अनेक गावांतील नागरिक पाणी पित असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. जांभुळपाडा आंबा नदीपात्रात अशाप्रकारे नदीपात्रात औषध टाकून मासे मारणाऱ्यांवर कडक शासन व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आंबा नदीपात्रात असे प्रकार वारंवार घडत असून अशाप्रकारचे अघोरी कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी. -श्रद्धा कानडे, सरपंच, वऱ्हाड जांभुळपाडा
अंबा नदीपात्रात विषारी औषध टाकून मासेमारी करणाऱ्यांच्या विरोधात कडक शासन केले जाईल. – दिलीप रायण्णावार, तहसीलदार, सुधागड-पाली