उरण (प्रतिनिधी) : उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून शनिवारी सकाळी दूषित पाण्याचा पुरवठा सुरू होता. यासंदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता सुट्टी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. या दूषित पाण्यामुळे जनतेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी सकाळी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू केला त्यावेळी नळातून काळे मिश्रित पाणी येत असल्याचे निदर्शनास आले.
सदर पाणी ज्याप्रमाणे गटाराचे पाणी असते असे दिसत होते, तसेच पाण्याला उग्र वास येत होता. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत नगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुट्टी असल्याने होऊ शकला नाही. मात्र शहरात अशा प्रकारचा दुषित पाणीपुरवठा होऊ लागला तर हे दूषित पाणी पिऊन शहरातील जनतेला साथीच्या आजारांचा सामना करण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
एकीकडे ‘स्वच्छ शहर, उरण शहर’ हे घोषवाक्याचा वापर उरण नगरपालिका करत असताना दुसरीकडे अशाप्रकारे दूषित पाणी शहरातील जनतेला पाणी त्यांचे आरोग्य बिघडवण्याचे काम नगरपालिका करत असल्याचा आरोप शहरातील जनतेनेकडून केला जात आहे.