Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्र१२७ वर्षांनंतर पुन्हा एकदा रायगडावर समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

१२७ वर्षांनंतर पुन्हा एकदा रायगडावर समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

मुंबई (प्रतिनिधी) : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस अॅडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली.

१२७ वर्षांपूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील गोडोली, फुरुस, पारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा ७० गावांतील मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या उत्सवाची कहाणी

रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला! १० मे १८१८ रोजी कर्नल प्रॉथरने यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला. किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते. शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शिवछत्रपतींची समाधीसुद्धा भग्न झाली होती.पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती. ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती, तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते. गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती. रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता. त्यानंतर रायगडचा उद्ध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती. रायगडचे राजकीय महत्त्व नष्ट झाले होते, पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले. २५ एप्रिल १८९६ रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -