मुंबई (प्रतिनिधी): आयपीएलच्या १५व्या हंगामातील शुक्रवारच्या (८ एप्रिल) सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध सातत्य राखण्याचे आव्हान गुजरात टायटन्ससमोर आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सला हरवत यंदाच्या हंगामाची आश्वासक सुरुवात केली. त्यांना सलग तिसऱ्या विजयाची संधी आहे. तसे झाल्यास १५व्या हंगामात विजयी हॅटट्रिक साधणारा तो पहिला संघ ठरेल. पंजाबने बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सना हरवून विजयी सुरुवात केली. मात्र, कोलकाताविरुद्ध पराभव पाहावा लागला.
या पराभवातून बोध घेत किंग्जनी आणखी एक किंग्ज असलेल्या चेन्नईवर मात करताना दुसरा विजय नोंदवला. दुसऱ्या विजयासह त्यांनी चार गुणांसह अव्वल चार संघांत स्थान राखले तरी फॉर्मात असलेल्या गुजरातविरुद्ध त्यांचा कस लागेल. गुजरातकडून केवळ सलामीवीर शुबमन गिल याला अर्धशतक लगावता आले आहे. मात्र, तो एकदा शून्यावरही बाद झाला आहे. टायटन्सनला राहुल तेवटियासह डेव्हिड मिलर, कर्णधार हार्दिक पंड्या आणि मॅथ्यू वॅडेकडून फलंदाजीत भरीव कामगिरी अपेक्षित आहे.
गोलंदाजीत मीडियम पेसर मोहम्मद शमीसह लॉकी फर्ग्युसन यांनी छाप पाडली तरी मध्यमगती वरूण आरोन आणि लेगस्पिनर रशीद खानला छाप पाडता आलेली नाही. पंजाब किंग्जचे फलंदाज फारसे फॉर्मात नाहीत. त्यांच्याकडूनही लियाम लिव्हिंगस्टोन यालाच पन्नाशी गाठता आलेली आहे. कर्णधार मयांक अगरवाल, शिखर धवन या प्रमुख फलंदाजांना सूर गवसलेला नाही. बॉलर्समध्ये लेगस्पिनर राहुल चहरने सातत्य राखले आहे.
वेळ : रा. ७.३० वा.