मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौकेचं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी जनवर्गणी गोळा करुन ती राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याचे किरीट सोमय्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. पण माहितीच्या अधिकारातून असा कोणताही निधी राजभवनात पोहोचलेला नाही अशी माहिती समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर सोमय्यांची २०१३ मधली एक फेसबुक पोस्ट नेटकऱ्यांनी शोधून काढली. राऊत यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत आज किरीट सोमय्या यांनी आपण त्यावेळी फक्त प्रतिकात्मक पद्धतीने केवळ ३५ मिनिटे निधी जमा केला होता, असे म्हटले आहे. विक्रांतसाठी १० डिसेंबर २०१३ रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. जेमतेम १० लोकांनी डब्यात पैसे टाकले. अवघ्या ३५ मिनिटांत इतका निधी कसा काय गोळा होऊ शकतो. काँग्रेसने देखील भीक मांगो आंदोलन केले होते. त्यातून त्यांनी किती पैसे गोळा केले, असा सवाल आता सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे एफआयआर कसा दाखल केला? एकही पुरावा नसताना एफआयआर कसा नोंदवला?, असे प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केले. राऊत आरोप करतात. त्यांनी याआधी माझ्यावर १७ आरोप केले. मात्र पुरावे दिले नाहीत, असेदेखील सोमय्या म्हणाले.
दरम्यान, नेटकऱ्यांनी किरीट सोमय्यांची ८ वर्षे जुनी फेसबुक पोस्ट काहींनी शोधून काढली आहे. ती व्हायरलदेखील झाली आहे. यामध्ये सोमय्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचा उल्लेख आहे. ‘राज्यपालांच्या भेटीत आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याची विनंती केली. विक्रांत शहीद स्मारक संग्रहालयासाठी मुंबईकर १४० कोटी जमवतील, असे सोमय्यांनी राज्यपालांना सांगितले,’ असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.