Tuesday, December 10, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघरच्या वाघोबा घाटात ट्रकला अपघात

पालघरच्या वाघोबा घाटात ट्रकला अपघात

दोघांचा मृत्यू, पाच जखमी

बोईसर (वार्ताहर) : पालघर पूर्व वावे गावातून विटा भरून पालघरकडे जाणारा ट्रक पालघरच्या वाघोबा घाटात उलटला. त्यामुळे त्या ट्रकखाली दबून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच कामगार जखमी झाले आहेत. त्यातील तीनजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डहाणू येथील वेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच दोघांवर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, वाघोबा घाटात ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे विटा भरलेला ट्रक उलटून विटांखाली आणि ट्रकखाली दोन कामगार दबले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. दरम्यान, चालकाने आधीच ट्रकमधून उडी घेतल्याने तो बचावला आहे. चालकाला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात उमेश पवार आणि दामू सुतार यांचा मृत्यू झाला असून शंकर भूतकडे, साईनाथ गवळी, अक्षय मानकर, कुंदन भंडारी, मनोज रावते जखमी झाले आहेत. त्यातील तिघांवर धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून एकजण गंभीर असल्याचे समजले आहे. याबाबत पालघर पोलीस पुढील तपास करत आहेत. पालघर-मनोर रस्ता हा महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तरीही या रस्त्यावर महामार्गावरील सोयी नसल्याने तसेच रस्त्याचे काम अपुरे आहे.

त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. पालघर घाटात बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले सुरक्षा कठडे तुटलेले आहेत. परिणामी एखाद्या वाहनचालकाच्या नजरचुकीने गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचे काम हे महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यात्यारीत येत असल्याने आणि प्राधिकरणाचे कार्यालय ठाणे येथे असल्याने नागरिकांना काही सूचना करायच्या असल्यास त्यांना ठाणे गाठावे लागते. म्हणून सहसा कुठलाही सामान्य नागरिक अथवा समाजसेवक जाणीवपूर्वक या रस्त्याबाबत तक्रार अथवा अपघातप्रवण क्षेत्राबाबत सूचना करायला जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

चौपदरीकरण झाल्यास अपघात कमी होतील

दरम्यान, हा रस्ता चौपदरीकरणासाठी प्रस्तावित असल्याचे समजले आहे. पालघर जिल्हा मुख्यालयाला जोडणारा मुख्य मार्ग असलेला हा रस्ता चौपदरीकरण झाल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -