गौसखान पठाण
सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील दहीगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, येथील पाणीप्रश्न सुटला नसल्याने गुरुवारी (ता. ७) वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व महिला आणि ग्रामस्थांनी रिकामे हंडे घेऊन पाली पंचायत समिती कार्यालयासमोर रिकामे हंडे घेऊन तीव्र आंदोलन केले. तसेच ग्रामस्थ रवी लोखंडे हे उपोषणास बसले होते. या वेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
दहिगाव बौद्धवाडी येथील ग्रामस्थ मागील दोन वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करत आहेत. मात्र ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार न करता केवळ उडवा-उडवीची उत्तरे देऊन हा विषय टाळत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे हाल होत आहेत. यासाठी त्यांना कोणाकडून तरी मागून पाणी आणावे लागत आहे. तसेच शासनाने १५ वित्त आयोगातून पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला असतानाही येथील पाणीपुरवठा योजना लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या वेळी केला.
या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड महासचिव आनंद जाधव, युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, युवा महासचिव प्रशांत गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोखंडे यासह नेते मंगेश वाघमारे, प्रमोद कदम, स्वप्नील गायकवाड, सचिन गायकवाड, रूपेश कदम व भागवत गायकवाड आदी पदाधिकारी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही’
या वेळी गटविकास अधिकारी विजय यादव, तहसीलदार दिलीप रायण्णावार, पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक महामुनी आदी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व यावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. ठोस व लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.