
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपकडून गुरुवारी मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा करण्यात आला. आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा करण्यात आला असून अद्याप नाल्यात गाळाचे ढिगारे कायम असून सत्ताधारी फरार असे दुर्दैवी चित्र पहायला मिळते आहे, अशी टिका आशीष शेलार यांनी केली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जात आहे.मुंबईकरांच्या दृष्टीने नालेसफाईची कामे महत्त्वाची असल्याने ही कामे पारदर्शी पद्धतीने पूर्ण व्हावीत, जेणेकरून मुंबईकरांना पुराचा फटका बसणार नाही यासाठी भाजप सेवा सप्ताहमध्ये नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जात आहे.
गुरुवारी भाजप नेते आशीष शेलार यांच्या नेतृत्वात नालेसफाईच्या कामांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. या वेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवक अभिजीत सामंत, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, पंकज यादव, उज्ज्वला मोडक आणि एच पश्चिम महापालिका वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदी सहभागी झाले होते.
गुरुवारी खार गझदर बांध साऊथ एव्हेन्यू नाल्यापासून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नॉर्थ एव्हेन्यू, एस.एन.डी.टी नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाला या नाल्यांची पाहणी करण्यात आली. एस.एन.डी.टी. नाला सोडला, तर अद्याप कुठेही कामाला सुरुवात झालेली नाही. सर्वच ठिकाणी नाल्यात गाळाचे ढिग पडून असून अवघ्या दिड महिन्यांच्या कालावधीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना या कामांना गती द्या, अशी सूचना आशीष शेलार यांनी केली.