अरुण बेतकेकर
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
जुन्या आठवणीतून, संजय राऊत यांनी लिहिलेल्या लोकप्रभा साप्ताहिकात ‘‘रामाची राजकीय फरफट’’ हा लेख दि. १९ एप्रिल १९९२ साली छापून आला होता. तो मोठ्या कष्टाने मी मिळवला आणि १० एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त त्यातील प्रमुख ठळक मुद्दे जनतेसमोर येणे महत्त्वाचे वाटल्याने ते सादर करीत आहे. या लेखात त्यांनी हलकटपणाची परिसीमा ओलांडली आहे. श्रीराम वादातीत कधीच नव्हते. काँग्रेसने तर श्रीराम हे काल्पनिक पात्र असे शपथपत्र सर्वोच्च नायायालयात दाखल केले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘‘जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असल्यास त्याचा मला अभिमान आहे.’’ शिवसेना, जेथे आज संजय राऊत स्वतः विराजमान आहेत. छाती बडवून म्हणतात, ‘‘बाबरी आम्हीच पाडली, राममंदिर आमच्यामुळेच…’’ १९ एप्रिल १९९२ ला राऊत लोकप्रभात असताना ह्या लेखाद्वारे बाबरी व राममंदिर विरोधात गरळ ओकतात. जुलै १९९२ मध्ये ते शिवसेनेचे मुखपत्र सामन्यात रुजू होतात. प्रथमच शिवसैनिक होतात. अवघ्या तीन महिन्यांत सरड्याप्रमाणे रंग बदलतात. आज म्हणतात, ‘‘राममंदिर हे राष्ट्राचे प्रतीक आहे. त्यासाठी शंभर बाबरी उद्ध्वस्त कराव्या लागल्या तरी आम्ही शिवसैनिक त्या करू.’’ संजय राऊत हे चारित्र्यहीन आहेत. ते आतंकी नसले तरी निश्चितच अराजक आहेत. असे मी नेहमी म्हणतो ते याचसाठी. राऊतांचा ‘‘रामाची राजकीय फरफट’’ हा लेख विकृत, विडंबन फोटोसह, विघ्नसंतोषी लोकांच्या मुलाखतीसह दोन भागांत आणि बारा पानांत विस्तारला आहे. त्यातील निवडक वाक्ये जशाच तशी मांडत आहेत.
लेखाचा गोषवारा लिहिताना सुरुवातीलाच संजय राऊत म्हणतात, ‘‘मंदिर वही बनायेंगे या घोषणेवरून रामाच्या अयोध्येत रणकंदन माजले. राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंनी आपलीच मंदिरे तोडली… वादग्रस्त मस्जिद सुरक्षित ठेवली… अयोध्येत रामभक्तांचे रक्त सांडले त्यास जबाबदार कोण? रामजन्मभूमीच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा रान उठवले. कारण या प्रश्नावर त्यांना आता दिल्लीची सत्ता काबीज करायची आहे… राजकीय लढाईत अयोध्येच्या रामाची राजकीय फरफट सुरू झाली आणि रामभक्त हनुमानास राजकीय नेत्यांनी आडवे केले… अयोध्येत नक्की काय घडत आहे? संजय राऊत ह्यांनी प्रत्यक्ष रामजन्मभूमी स्थानावर जाऊन आणलेली खळबळजनक माहिती.’’
अयोध्येत मंदिरावर बुलडोझर फिरले. मंदिरे उद्ध्वस्त झाली. मंदिरावर मालकी हक्क सांगणाऱ्या महंताना नुकसानभरपाई दिली. हा पैसा कुणी दिलाय? ज्यांना पैसा मिळाला ते मूर्ती घेऊन निघून गेले. ज्यांना पैसा मिळाला नाही ते अयोध्येच्या नाक्यावर बोंबलत फिरत आहेत. प्रभू रामचंद्रांची अयोध्या इतकी थकलेली आणि अपमानित झालेली कुणीच पहिली नसेल. त्या लढाईत हनुमान आडवा पडला… हे सर्व रामाच्या साक्षीने झालं. रामापेक्षा राजकारणी मोठे झाले. तोडलेल्या मंदिरांच्या ढिगाऱ्यावर उभे राहून ते भाषणे देऊ लागले. तेव्हा अयोध्येतील राम संपला सर्वार्थाने… रामाचे वैरी संपूर्ण अयोध्येत लपून-छपून वावरत असल्याची जाणीव पावलोपावली होते… ही तीच अयोध्या आहे. पण अयोध्येत राम शिल्लक नाही. रामास राजकारण्यांनी गर्भगृहाच्या कैदेत डांबून ठेवले आहे.
तरीही येथे युद्ध झालं, हत्या झाल्या, नि:शस्त्र रामभक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली. रस्त्यावर रामभक्तांच्या मुडद्यांचे खच पडले, त्याच रस्त्यावर मोटारीने धुरळा उडवीत राजकारणी पुन्हा अयोध्येत पोहोचले… त्याचवेळी अयोध्येत संकटविमोचन हनुमानाच्या मंदिरावर बुलडोझर धडक मारीत होता. धुळीचे लोठ उठले आणि हनुमान आडवा पडला. गर्भगृहातील रामलल्ला हनुमानाची अवस्था पाहून व्यथित झाला. पण कैदखान्यातील श्रीराम हनुमानाच्या मदतीस पोहोचू शकले नाहीत… कोणी म्हणत होते. हनुमानाचे पाय तुटले आहेत. पवनपुत्र बुलडोझरच्या फटक्याने जखमी झालाय… मंदिर तोडायचे पैसे घेतले आहेत. पण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रामाश्रयदासाला हाताशी धरून त्याचं तोंड बंद केले. आता मंदिर तुटले काय आणि हनुमान जखमी झाला काय कुणाला दुःख आहे? हनुमानाची मूर्ती जमिनीवर ठेवली होती. हनुमानजी निपचित पडले होते. राम-रावण युद्धातही अजेय ठरलेल्या बजरंगास राजकारण्यांनी आडवा केला होता… वगैरे वगैरे.
लेखाच्या उत्तरार्ध भागाचा गोषवारा करताना राऊत म्हणतात, ‘‘अयोध्येत रामजन्मभूमीस्थानावर मंदिर कदापी उभे राहणार नाही. कारण राम आता ईश्वर राहिला नसून राजकीय प्यादे झाले आहे. रामलल्ला राजबंदी झाल्याचे अयोध्येत दिसले.’’
लेखात राऊत म्हणतात, ‘‘राजकीय धुक्याने आणि उद्ध्वस्त मंदिराच्या धुळीने भरलेली आणि त्या धुळीने भरलेल्या अयोध्येत श्रीराम कोंडले गेले आहेत. घुसमटले आहेत. रामाचा उद्धार कोण करणार? शास्त्रोक्त वचनांची छाननी करणारे खुरटे राजकारणी की गंडमाळा घालून फिरणारे साधू आणि महंत?… भाजपची हाव वाढत गेली. बंदिवान रामाला ते सोडायला तयार नव्हते. रामाची राजकीय फरफट सुरूच राहिली… अयोध्या आणि रामलहर थंड पडताना दिसली. लाखोंची गर्दी फक्त शेकड्यांवर आली. कार्तिक मेळाव्यासही माणसं नव्हती. व्यापारी भिकेस लागले. नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहू लागली. तेथे धर्मशाळा ओस पडल्या. वंचना, निराशा, वेदना आणि आकांत याची जाणीव रामभक्तांना होऊ लागली… अग्नीतून ठिणग्या निर्माण व्हाव्यात याप्रमाणे एकाच ईश्वरी तत्त्वातून हे संपूर्ण जग निर्माण झाले. पण अयोध्या त्याला अपवाद आहे. अयोध्येतील राम ईश्वर राहिला नसून राजकीय प्यादे झाले आहे. अयोध्येत रामजन्मभूमी स्थानावर मंदिर कदापी उभे राहणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असल्याने भाजप नेते भांबावले आहेत…. वगैरे वगैरे.
अयोध्या भेटीदरम्यान राऊत मुख्यमंत्री कल्याण सिंह, आंदोलनातील एक अग्रणी विनय कटियार, मुलायम सिंह यादव तसेच अनेक विघ्नसंतोषी लोकांना भेटले. त्याचा खोचक, नकारार्थी व विरोधाभास या लेखात ठाचून भरला आहे. उदाहरण दाखल, कटियार यांना राऊतांनी प्रश्न केला, ‘‘पण मशीद येथे राहायला काय हरकत आहे?’’ कटियार उत्तरले, ‘‘तुम्ही काय बोलताय? तुमच्या अंगात हिंदू रक्त आहे ना?’’
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे आकर्षक भव्यदिव्य मंदिर निश्चित असलेल्या गर्भगृहस्थानी लोक देणगीतून आणि कारसेवकांच्या श्रमदानाद्वारे बांधले जात आहे. राम भक्त हिंदू धर्मियांना भारतीय जनता पक्षाने दिलेले वचन आज मूर्तस्वरूपात येताना दिसत आहे.