मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे. कार्यालये, कचेऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे चांगल्या कामगारांना मागणी वाढत आहे. ५४ टक्के कंपन्यांमध्ये चालू तिमाहीत नोकऱ्यांची चंगळ असणार आहे. ‘टीमलीज सर्व्हिसेस’ने आर्थिक वर्ष २०२२-२३च्या एप्रिल-जून या तिमाहीसाठी तयार केलेल्या ‘एम्प्लॉयमेंट आउटलूक’ अहवालानुसार या तिमाहीत नोकरभरतीची लाट येणार आहे. एप्रिल-जून या तिमाहीत ५४ टक्के कंपन्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. देशातल्या २१ प्रदेशांत कार्यरत असलेल्या ७९६ लघू, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे.
जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत ही संख्या चार टक्क्यांनी अधिक असणार आहे. ‘टीमलीज’चे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाले, कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत घेणे आणि सकारात्मक आर्थिक विकासाच्या अंदाजांसह सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढत आहे. १४ हून अधिक क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता प्रत्येक विभाग सक्रियपणे काम करत असून कोविडमुळे आलेला सुस्तपणा आणि नैराश्याचे ढग हटले आहेत. देशातील २१ प्रदेशांत कार्यरत असलेल्या ७९६ लघू, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन-पे डिसेंबर २०२२ पर्यंत देशभरातील एकूण कर्मचार्यांची संख्या दुप्पट करेल, त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या ५,४०० वर जाईल.
सध्या कंपनीकडे दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. येत्या १२ महिन्यांत बंगळूर, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांत सुमारे दोन हजार आठशे लोकांना विविध पदांवर नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे, असे ‘फोन पे’ने स्पष्ट केले आहे. या नियुक्त्या अभियांत्रिकी, उत्पादन, विश्लेषण, व्यवसाय विकास आणि विक्री विभागांतील पदांवर केल्या जातील. इतर कंपन्या देत असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन आणि इतर सोयी-सुविधा देत असल्याने इतर कंपन्यांपेक्षा फोन पे सोडून जाणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कंपनी कर्मचारी हिस्सा मालकी योजनेच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याची संधी सर्व कर्मचाऱ्यांना मिळते.
‘फोन पे’चे मनुष्यबळ प्रमुख मनमीत संधू म्हणाले, ‘तंत्रज्ञानावर आधारित आणि सर्वांसाठी मूल्य निर्माण करणारी दीर्घकालीन शाश्वत संस्था आम्ही उभारत आहोत.’ चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून या कालावधीत सुमारे दोन लाख पदे रिक्त असतील, देशातील नऊ सेक्टरमधील एक लाख ८७ हजार ६२ पदे रिक्त आहेत. नव्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. या कंपन्यांनी एप्रिल-जूनपर्यंत देऊ केलेल्या एकूण नोकऱ्यांच्या तुलनेत रिक्त जागांचा हा आकडा किंचित ०.६ टक्क्यांपेक्षा थोडा अधिक आहे. नऊ सेक्टरमध्ये ३०.८ दशलक्ष लोक नोकरी करतात. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.