मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’चे संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकरांकडून जमा केलेला निधी लाटल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर आज भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपण फक्त ३५ मिनिटे प्रतिकात्मक निधी जमा केला होता, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर काही मिनिटातच संजय राऊत यांनी सोमय्यांचे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, त्याचा दाखला देत नवा आरोप केला आहे.
“मैने तो ५८ करोड का हिसाब मांगा था… बात १४० करोड तक पहुंच गयी… क्रोनोलॉजी को समज लिजिये. प्यारे देश भक्तो… गडबड ही गडबड हैं…”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. यात राऊत यांनी सोमय्या यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी केलेले एक ट्विट जोडले आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेऊन आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी आणि या जहाजाचे संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकर १४० कोटी रुपये देण्यासाठी तयार आहेत, असे म्हटले आहे.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा सोमय्यांचा डाव – राऊत
मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही अमराठी धनाड्य लोक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.