कन्नूर (वार्ताहर) : निवडणूक आयोग सीबीआय, आयबी या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आपले राजकीय विरोधक संपवण्यासाठी सरकार करत असल्याबद्दल माकपचा राष्ट्रीय अधिवेशनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, सीबीआय यांचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा माकपचे जनरल सेक्रेटरी सिताराम येचुरी यांनी आरोप केला. कन्नूर येथे भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी ही चिंता जाहीर केली.
या केंद्रीय संस्थांमध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक असून, याविरुद्ध लोकशाहीवादी व्यक्तींनी एक व्हावे, असा आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे जातीय व धार्मिक तणाव वाढत आहे. त्याविरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आले पाहिजे. माकपच्या तेविसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी येचुरी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, धार्मिक ध्रुवीकरण विरुद्ध सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एक झाले पाहिजे, तरच देशाचे संविधानाचे रक्षण होईल. युवक विद्यार्थी शेतकरी कामगार महिला नेहमीच्या ‘ब्रेड बटर’साठी संघर्ष करीत असताना, सरकार आपल्यात धर्मांच्या नावाखाली विभागणी करू इच्छिते. सरकारच्या या कटकारस्थानाला आपण बळी पडू नये. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपणा सर्वांसोबत देशाच्या एकात्मतेसाठी प्राणपणाने लढेल.