Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडालखनऊचा सलग तिसरा विजय

लखनऊचा सलग तिसरा विजय

दिल्लीवर ६ विकेट राखून सरशी

नवी मुंबई (प्रतिनिधी) : क्वींटॉन डी कॉकची धडाकेबाज (५२ चेंडूंत ८० धावा) फलंदाजी आणि रवी बिश्नोई, किष्णप्पा गौथम यांच्या प्रभावी गोलंदाजीने लखनऊला गुरुवारी दिल्लीविरुद्धचा सामना जिंकवून दिला. या विजयासह लखनऊने यंदाच्या हंगामातील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीच्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊला कर्णधार लोकेश राहुल आणि क्वींटॉन डी कॉकने चांगली सुरुवात करून दिली. लोकेश संयमी तर क्वींटॉन डी कॉक फटकेबाजी करत होता.

या जोडीने लखनऊला नाबात अर्धशतकाचा टप्पा गाठून दिला. संघाची धावसंख्या ७३ असताना लोकेश राहुलच्या रुपाने लखनऊला पहिला धक्का बसला. कुलदीप यादवने लोकेशचा अडथळा दूर केला. लोकेशने २५ चेंडूंत २४ धावा केल्या. वनडाऊन फलंदाजीला आलेल्या इवीन लेवीसला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. अवघ्या ५ धावा करत तो माघारी परतला. क्वींटॉन डी कॉकने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ५२ चेंडूंत ८० धावांचे मोलाची कामगिरी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सनी नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ३ बाद १४९ धावांची मजल मारली. पृथ्वी शॉसह (३४ चेंडूंत ६१ धावा) कर्णधार रिषभ पंत (३६ चेंडूंत नाबाद ३९ धावा) आणि सर्फराझ खानमुळे (२८ चेंडूंत नाबाद ३६ धावा) त्यांना दीडशेच्या घरात पोहोचता आले. लखनऊकडून लेगस्पिनर रवी बिश्नोई (४-०-२२-२) तसेच ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतमने (४-१-२३-१) अचूक मारा केला.

पृथ्वीने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकताना अवघ्या ३४ चेंडूंत ६१ धावा फटकावल्या.पृथ्वीने चांगली सुरुवात करून दिली तरी दुसरा सलामीवीर वॉर्नरसह (४ धावा) रोवमन पॉवेल (३ धावा) झटपट परतल्याने १ बाद ६७ धावांवरून दिल्लीची अवस्था ११व्या षटकांत ३ बाद ७४ धावा अशी झाली. कठीण समयी कॅप्टन रिषभसह सर्फराझ धावून आले. या जोडीने ९.३ षटकांत ७५ धावांची नाबाद भागीदारी करताना दिल्लीला सावरले. लखनऊकडून बिश्नोईने ४ षटकांत २२ धावा मोजताना २ विकेट घेतल्या. गौतमनेही सुरेख स्पेल टाकताना ४ ओव्हर्समध्ये एक मेडन टाकताना २३ धावा देत एक विकेट घेतली.

 

सिक्सर्सचे द्विशतक; चौकारांची संख्या चारशेच्या दिशेने

आयपीएल म्हटल्यानंतर चौकार-षटकारांची आतषबाजी आलीच. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पुणे येथे झालेल्या बुधवारच्या लढतीपर्यंत म्हणजे १४ सामन्यांनंतर षटकारांचे द्विशतक (२१४) पूर्ण झाले आहे. चौकारांची संख्या ३८७ इतकी झाली आहे.

बटलर, रसेलचे सर्वाधिक षटकार

राजस्थानच्या जोस बटलरच्या नावावर ३ सामन्यांनंतर सर्वाधिक १४ षटकारांची नोंद आहे. कोलकाताच्या आंद्रे रसेलने ४ सामन्यांत १२ सिक्सर मारलेत. भारताकडून सर्वात जास्त षटकार राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर आहेत. त्याने ३ सामन्यांत ९ सिक्सर मारलेत.

चौकार मारण्यात ईशान आघाडीवर

चौकार मारण्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशन आघाडीवर आहे. तीन सामन्यांत त्याने १७ चौकार मारलेत. सर्वाधिक सिक्सर मारणारा जोस बटलर (३ सामन्यांत १४ चौकार) दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य नऊ बॅटर्सनी दहा किंवा दहाहून अधिक चौकार लगावले आहेत. त्यात चेन्नईच्या रॉबिन उथप्पासह शिवम दुबे, बंगळूरुचा दिनेश कार्तिक, लखनऊचा क्विंटन डी कॉक, पंजाबचा शिखर धवन, चेन्नईचा महेद्रसिंग धोनी, लखनऊचा दीपक हुडा, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि त्याचा सहकारी अजिंक्य रहाणेचा समावेश आहे.

षटकार २१४ चौकार ३८७ (मुंबई वि. कोलकाता लढतीपर्यंतची संख्या)

२२ फलंदाजांच्या हाती भोपळा

पहिल्या १४ सामन्यांत २२ फलंदाज शून्यावर बाद झालेत. त्यात लखनऊचा कर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुलसह चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा, त्यांचाच ओपनर ऋतुराज गायकवाड, चेन्नईचाच अष्टपैलू मोईन खान, ड्वायेन ब्राव्हो, हैदराबादचा निकोलस पुरन. गुजरातचा शुभमन गिल आदी प्रमुख बॅटर्सचा समावेश आहे.

सर्वाधिक धावा करणारे बॅटर (ऑरेंज कॅप)

बटलर (राजस्थान) ३ सामन्यांत २०५ धावा
ईशान किशन (मुंबई) ३ सामन्यांत १४९ धावा
डु प्लेसिस (बंगळूरु) ३ सामन्यांत १२२ धावा

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप)

उमेश यादव (कोलकाता) ३ सामन्यांत ९ विकेट
युझवेंद्र चहल (राजस्थान) ३ सामन्यांत ७ विकेट
अवेश खान (लखनऊ) ३ सामन्यांत ७ विकेट

रोहित, विराटला प्रतीक्षा फॉर्मची

भारताचे आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला फॉर्मची प्रतीक्षा आहे. तीन सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात अनुक्रमे ५४ आणि ५८ धावा आहेत. कोलकात्याचा कर्णधार कर्णधार श्रेयस अय्यरला तीन सामन्यांत ६९ धावा जमवता आल्यात. लखनऊच्या डी कॉकला तीन सामन्यांत ६९ तसेच हार्दिक पंड्याला ६४, पॅट कमिन्सला ५६ धावा करता आल्यात.

कोहली – नाबाद ४१, १२, ५ शर्मा – ४१, १०, ३

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -