
ठाणे(प्रतिनिधी) : लोकमान्य नगर येथे श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात संघर्ष मंडळ तसेच पुरुष गटात विश्वरूप मंडळ, विवेकस्मृती संघांनी विजयी सलामी दिली. महिला गटाच्या उद्घाटनीय सामन्यात ठाण्याच्या ओम न्यूवर्तक मंडळाने डोंबिवलीच्या गावदेवी मंडळाचा ४५-२९ असा पराभव केला खरा. पण दुसऱ्याच फेरीत नवी मुंबईच्या रा. फ. नाईक संघाकडून त्यांना ३०-२९ असा निसटता पराभव पाहावा लागला. चुरशीच्या सामन्यात पूर्वार्धात १७-१३ अशी ४ गुणांची आघाडी ओम न्यूवर्तककडे होती. ती त्यांना टिकविता आली नाही. उत्तरार्धात रा. फ. नाईकच्या तनुजा गोळे, साक्षी सावंत यांनी टॉप गिअर टाकत झंजावाती खेळ केला आणि सामना आपल्या बाजूने झुकविला.
ओम न्यूवर्तकच्या साक्षी माने, पूजा जाधव यांनी आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात आपल्या संघाला आघाडीवर ठेवले होते.पण उत्तरार्धात त्यांना तो जोश राखणे जमले नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. याच गटात कोनच्या संघर्ष मंडळाने खारेगावच्या जयभारत मंडळाला ४३-२० असे सहज पराभूत केले. मध्यंतराला १९-८ अशी भक्कम आघाडी विजयी संघाकडे होती. देवयानी पाटील, गौरी मांझा यांच्या चतुरस्त्र खेळाला संघर्षाच्या विजयाचे श्रेय जाते. जयभारतची श्रेया गावंड उत्कृष्ट खेळली. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात ठाण्याच्या विश्वरूपने कालवारच्या श्री समर्थला ४०-२८ असे नमवित विजयी सलामी दिली. विश्रांतीला १५-१७ अशा २ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या विश्वरूपच्या अनिकेत रहाटे, रोहित मेहेर यांनी नंतर मात्र जोरदार आक्रमण व धाडशी पकडी करीत संघाला १२गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.
पूर्वार्धात प्रभाव पाडणाऱ्या श्री समर्थच्या रोशन व रमेश या म्हात्रे बंधूंना उत्तरार्धात मात्र आपला ठसा उमठविता न आल्याने पराभवाला सामोरी जावे लागले. कालवारच्या विवेकस्मृतीने डोंबिवलीच्या आत्माराम मंडळावर २८-१५ असा विजय मिळविला. पूर्वार्धात संथपणे खेळल्या गेलेल्या या सामन्यात १०-०७ अशी विवेकस्मृतीकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र मंगेश व गोविंद म्हात्रे यांनी उत्कृष्ट चढाई-पकडीचा खेळ करीत सामना सहज आपल्या खिशात टाकला.