पुणे (प्रतिनिधी) : जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातल्या घरांची विक्री नऊ टक्क्यांनी वाढली आहे. देशातल्या आठ मोठ्या शहरांमध्ये ७८ हजार ६२७ घरांची विक्री झाली आहे, असं ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. देशभरात ही स्थिती असताना मुंबईत मात्र उलटी स्थिती आहे. पुण्यातही तेच झालं आहे. मुंबईतल्या घरांची विक्री नऊ टक्क्यांनी, तर पुण्यातली विक्री २५ टक्क्यांनी घटली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये घरांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असले तरी बँका स्वस्तात कर्ज द्यायला तयार असल्याने घरांच्या खरेदीला प्रतिसाद मिळाला आहे. मागील आठवड्यात ‘ऍनारॉक’ आणि ‘प्रॉपटायगर’ या संस्थांनी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित काही डाटा जाहीर केला होता.
सात शहरांतील घरांची विक्री ७१ टक्क्यांनी वाढून ९९ हजार ५५०वर गेल्याचे ‘ऍनारॉक’ने म्हटलं होतं. ‘प्रॉपटायगर’ने आठ मोठ्या शहरांतील वाढ सात टक्के आणि घरांची विक्री ७० हजार ६२३ने वर गेल्याचं म्हटलं होतं. ‘नाइट फ्रँक’च्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये २०२२च्या पहिल्या तिमाहिमध्ये ७८, ६२७ घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २१ हजार ५४८ घरांची विक्री झाली. इथली वृद्धी मात्र वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी घसरली, तर पुण्यातील घरांची विक्री २५ टक्क्यांनी घसरली.
पुण्यात दहा हजार ३०५ घरे विकली गेली. ही मोठी घसरण आहे. कारण घरांची विक्री वाढावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली; मात्र त्यानंतरही ही घसरण झाली आहे. घरांच्या किमती सात ते दहा टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे कर्जही महाग होणार आहे. घर बांधकामासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किंमती एक वर्षापासून महागल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अॅल्युमिनिअमसह प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत. वर्षभरात सिमेंटच्या किमती २२ टक्के, स्टील ३० टक्के, तांबे आणि अॅल्युमिनिअमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्च देखील वाढला आहे. कामगारांची मजुरीदेखील वाढलेली आपल्याला दिसून येते. बांधकामाच्या एकूण खर्चात ६७ टक्के कच्चा माल, मजुरी २८ टक्के आणि इंधनाचा खर्च ५ टक्के याचा समावेश असतो, असे ‘रिअल इस्टेट कंपनी कॉलिरस’च्या एका अहवालातून समोर आले आहे.
बांधकामाला लागणारा सर्वच कच्चा माल महाग झाला आहे. वर्षभरात बांधकामाच्या खर्चात जवळपास दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गृहनिर्माण बांधकामाचा खर्च दोन हजार ६० रुपये प्रतिचौरस फूट होता, तो आता दोन हजार तीनशे रुपये झाला आहे. दुसरीकडे औद्योगिक बांधकामाचा खर्चदेखील वाढला आहे. कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली होती. आता संपूर्ण निर्बंध उठवल्यानंतरही बांधकाम क्षेत्रांत मागणी वाढली नाही. तरीही बिल्डरांनी घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत घरांच्या विक्रीत सात टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीत घरांच्या किमतीतही सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.