Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीकोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना रोजगाराची संधी

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना रोजगाराची संधी

मुंबई (प्रतिनिधी) : माहिम येथील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल येथे “होम हेल्थ एड” या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले. महिला व बालविकास कार्यालयाकडून पुरस्कृत विधवा महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र देऊन हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करून देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशिक्षणार्थी वैभवी कडू, पल्लवी मोरे यांनी आभार व्यक्त केले.

या महिलांना दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर या दोन्ही महिलांना आता पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अटेंडंट पदावर नोकरीसाठी नियुक्ती देण्यात आली आहे. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल, कौशल्य विकास समन्वयक हितेश हिरे व हिंदुजा हॉस्पिटलच्या वरिष्ठ मॅनेजर भावेशा खरनारे यांनी नियोजन केले. कोरोना माहामारीमुळे आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव जाणवू  लागला होता.

यासाठी शासनाने आरोग्यसेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम” घोषित केला. मुंबई शहर जिल्ह्याला ६०० प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय रुग्णालये व काही खासगी रुग्णालये यांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले. जिल्ह्यातील १३ रुग्णालयामध्ये आरोग्यसेवा क्षेत्रातील १२ कोर्सेससाठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -