चंद्रपूर (हिं.स.) : आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत चंद्रपूर, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येत असून दोन महिन्यात १० हजारांच्या वर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील पिपरी धानोरा, नकोडा, तडाळी, येरुर अशा एकूण १७ गावात २२९९ नागरिकांची तपासणी, ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा, तुलनमेंढा, वायगाव, कोसंबी, हळदा, चांदली व इतर अशा एकूण १५ गावात ३४९३, सावली तालुक्यातील हिरापूर, डोनाळा, पारडी, सायखेडा, चारगाव व इतर अशा १३ गावात २४२३ आणि सिंदेवाही तालुक्यातील घोट, किन्ही, कच्चेपार, जामसाळा व इतर अशा १२ गावात १८१५ अशा एकूण १० हजार ३० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यात सर्दी, खोकला, ताप, शरीर वेदना, मधुमेह चाचणी, रक्तदाब, करोना तपासणी आदींचा समावेश होता. या फिरत्या दवाखान्यात एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर असून प्राथमिक आरोग्यासाठी 20 प्रकारची औषधी उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.