Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकळवा एसटीची जागा रुग्णालयासाठी, ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या डेपोची जागा वाहनतळासाठी देण्यास मंजुरी

कळवा एसटीची जागा रुग्णालयासाठी, ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या डेपोची जागा वाहनतळासाठी देण्यास मंजुरी

परिवहन मंत्री अनिल परब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

मुंबई, (हिं.स.) : ठाणे शहरातील कळवा रुग्णालयाजवळील एसटी कार्यशाळेच्या जागेवर पालिकेचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यास तसेच ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानकाची जागा भूमिगत वाहनतळासाठी देण्यास परिवहन विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी कार्यशाळेच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी बस स्थानकाच्या जागेवर भूमिगत वाहनतळ उभारण्यासाठीही ते आग्रही होते. या अनुषंगाने पुन्हा बैठक पार पडली. याबाबत यापूर्वी झालेल्या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांचा सुधारित विकास आराखडा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर करण्यात आला होता.

त्यावेळी या दोन्ही योजनांना जागा देण्यासाठी तत्वतः मंजुरी देताना एसटीची गरज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून त्यांनतरच हे भूखंड विकसित करायला परवानगी देवू असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र बसून महामंडळाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार सुधारित आराखडा परिवहन मंत्र्यासमोर सादर केला. यातून परिवहन महामंडळाची गरज आणि ठाणे महानगरपालिकेचे हित दोन्ही साध्य होत असल्याने या प्रकल्पांना जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवणे तसेच रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने त्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे बनले होते. आज परिवहन मंत्र्यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याने हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करणे शक्य होईल असे मत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह नगरविकास, एसटी आणि ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -