उरण (वार्ताहर) : नगरपालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. मात्र उरण नगरपालिकेतील समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आजतागायत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. यावरून उरण नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार एकदम निष्क्रिय असल्याचे दिसून येते. कारवाईचा बडगा उगारला, तर अधिकाऱ्यांची आर्थिक दुकाने बंद होण्याची भीती त्यांना वाटत असल्याची चर्चा नाक्यांनाक्यावर जनतेत सुरू आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगरपालिकांची मुदत संपल्याने व निवडणुका काही महिने लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामध्ये उरण नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार प्रांतअधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे; परंतु आजतागायत कधी सदर प्रशासकीय अधिकारी उरण नगरपालिका कार्यालयात दिसत नाही. उलट कार्यालयात काही नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उठबस अधिकाऱ्यांकडे असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे समस्या मांडल्या, तर हे अधिकारी ‘साहेबांना विचारा’ असे उत्तर देतात. त्यामुळे अशा अधिकऱ्यांविरोधात जनतेत संतापाची लाट आहे. दरम्यान, काही अधिकारी यांनी नवीन बाधकामांस पार्किंग सक्तीचे नसल्याचा व अनधिकृत बांधकामांवर कार्यहवाल आल्यानंतर कारवाई करू असे धक्कादायक उत्तर दिले. तथापि, अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केल्याचे दिसत नाही, असेही येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
उरणला समस्यांचा विळखा
दरम्यान, उरण नगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती आल्यापासून अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी, फेरीवाले, भंगारमाफिया, अर्धवट नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे साम्राज्य, इमारत उभी करताना दिलेल्या नियमांची पायमल्ली करून पार्किंगची सोय न करणे, ठेकेदारांची चेक लगेच काढली जातात, ठेकेदारांचा मनमानी काम करणे, अनधिकृत नळ कनेक्शन अशा अनेक समस्यांचा सामना उरण शहरातील जनतेला करावाला लागत आहे.
शहरात लवकरच बदल जाणवेल.- संतोष माळी, मुख्याधिकारी
अनधिकृत बांधकामांचा कार्यहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. – सचिन भानुसे, नगररचनाकार
सर्वच नवीन इमारतींना पार्किंगची सक्ती नाही.- झुंबर माने, ओव्हरसियर
तोंडी माहिती देऊ शकत नाही, लेखी मागावी.- हरेश तेजी, आरोग्य विभाग निरीक्षक