वॉशिंग्टन : रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान, भारताने रशियाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेची मोठी निराश झाली असून, भारताच्या या भूमिकेवर वारंवार दबाव आणूनही भारताने रशियाबाबत आपली तटस्थ भूमिका बदलली नाही. त्यामुळे अखेर अमेरिका चक्क आता भारताला धमकी देण्यावर उतरली आहे. एवढेच नव्हे तर, भारताने रशियाशी युती केली तर, भविष्यात त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी तंबी अमेरिकेने भारताला दिली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (व्हाईट हाऊस नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे संचालक) यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार ब्रायन डीझ यांनी म्हटले आहे की, अमेरिकन प्रशासनाने भारताला रशियाशी संबंध न ठेवण्याचा इशारा दिला आहे. युक्रेन-रशिया युद्धावर भारताच्या काही प्रतिक्रियांमुळे अमेरिका निराश झाल्याचे ते म्हणाले. ख्रिश्चन सायन्स मॉनिटर या आंतरराष्ट्रीय वृत्त वेबसाइटने बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिका “युद्धाच्या संदर्भात असे अनेक प्रसंग आले आहेत जिथे चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या निर्णयांमुळे आम्ही निराश झालो आहोत.” असे डीज यांनी सांगितले. त्याशिवाय भारताने रशियासोबतची राजकीय भागीदारी वाढवली तर, त्याचे दीर्घकालीन परिणाम भारताला भोगावे लागतील, असे अमेरिकेने भारताला सांगितले असल्याचे ते म्हणाले.
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबाबत अमेरिका, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान आदी देशांनी रशियावर तीव्र शब्दात टीका करत मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले आहेत. तर, दुसरीकडे भारताने रशियाने केलेल्या हल्ल्यावर साधी टीकाही केलेली नाही. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावांवर मतदान करण्यापासूनही भारताने स्वतःला दूर ठेवले आहे. हिंसाचार त्वरित संपला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी चर्चेच्या मार्गाने मतभेद सोडवले पाहिजेत, असे मत भारताने सातत्याने व्यक्त केले आहे. त्याशिवाय भारतानेही युक्रेनला मदत पाठवली आहे. त्याचवेळी रशिया भारताला सवलतीच्या दरात इंधन तेल देऊ करत आहे, ते घेण्यास भारत तयार आहे. भारतानेही पूर्वीप्रमाणेच रशियाकडून तेल आयात करणे सुरू ठेवले आहे.
गेल्या काही दशकांमध्ये भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत आणि दोन्ही देशांमधील राजकीय संबंधही बऱ्याचअंशी दृढ झाले आहेत. चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने भारताची साथ देण्याची तयारी दाखवली असून, अनेकदा भारताच्या बाजूने विधानेदेखील केली आहेत. चीनच्या वाढत्या कारावायांचा मुकाबला करण्यासाठी भारतालाही अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे, परंतु रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या न्याय्य आणि स्वतंत्र भूमिकेमुळे अमेरिका भारतावर प्रचंड नाराज झाली आहे. भारताची ही भूमिका बदलण्यासाठी अमेरिकेने भारताशी अनेक स्तरावर चर्चा करून भूमिका बदलण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. मात्र, भारत त्याच्या भूमिकेवर तटस्थ असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांशी रशियाविरुद्धच्या नवीन निर्बंधांवर चर्चा केली आहे. अमेरिका आणि उर्वरित जी-7 देश भारतासोबतचे सहकार्य चालू ठेवतील आणि त्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत राहतील, असे ते म्हणाले. भारत आणि अमेरिका हे अन्न सुरक्षा आणि जागतिक ऊर्जेमध्ये मोठे सहयोगी आहेत. इथे भारताने रशियासोबतचे संबंध अधिक घट्ट करू नयेत आणि तेल आणि संरक्षण शस्त्रांवरील आपले अवलंबित्व संपवू नये, असे अमेरिका म्हणत आहे. त्या बदल्यात अमेरिका भारताला शस्त्रे आणि तेल देईल असेदेखील अधिकाऱ्याने सांगितले. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे.