Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकोकणात अवकाळी पावसाचे धुमशान

कोकणात अवकाळी पावसाचे धुमशान

घरावर वीज कोसळली

काजू, आंबा पिकांचे नुकसान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अवकाळी पाऊस व जोरदार वारे यांनी मालवण परिसरात मोठे नुकसान केले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी मालवण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार अजय पाटणे यासह महसूल अधिकारी उपस्थित होते.

वायरी भागात झाडे पडून घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. मालवण तालुक्यात सुमारे १५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच एक प्राथमिक शाळा इमारत, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, हॉटेल, एक गोठा यांचे पडझड होऊन नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह अनेक ठिकाणी मार्गावर तसेच वीज वाहिन्यांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होता. ८ एप्रिल पर्यत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान डिंगणे-आंबेडकरनगर येथील प्रिया रामदास डिंगणेकर यांच्या घरावर मंगळवारी रात्री अवकाळी पावसात वीजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने डिंगणेकर कुटुंबीय यातून बचावले. मंगळवारी रात्री बांदा दशक्रोशीला मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी उशिरा वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

कुडाळ तालुक्यात लाखोंचे नुकसान

विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी कोसळलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यामध्ये सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० घरांचे मोठे नुकसान झाले आहे असा प्राथमिक अंदाज असून अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत, अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार सध्या १० घरांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

बांदा दशक्रोशीला झोडपले

बांदा दशक्रोशीला वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी झोडपले. यात आंबा, काजू, कोकमसह रब्बी पिकांना जोरदार फटका बसला आहे. अजूनही दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे. शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून विमा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने बांदा, मडुरा दशक्रोशील झोडपले. सुमारे तासभर झालेल्या पावसाचा आंबा, काजू, कोकमसह मिरची, चवळी, कुळीथ, भुईमूग, नाचणी आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वायंगणी भातशेतीवरही याचा परिणाम झाला.

दरम्यान अवकाळी पावसामुळे परिपक्व न झालेल्या आंबा फळावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. काजू पिकाचीही तशीच अवस्था आहे. रब्बी पिकेही मोडून पडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने अजून दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविल्याने बळीराजाची धाकधूक मात्र वाढली आहे. कृषी व महसुल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -