नवी मुंबई (वार्ताहर) : शहरातील गावांची ओळख पुसू नये यासाठी पालिकेकडून नवी मुंबईतील विविध गावांच्या वेशीवर कमानी बांधल्या आहेत. तसेच कमानीवर गावांची नावे उठावदार अक्षरात लिहिली जात आहेत. आग्रोली गावाच्या वेशीवर कमानी बांधली आहे. पण नाव मात्र टाकण्यास पालिकेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे गाव आहे पण नाव नाही अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर एकूण दिघा ते बेलापूर दरम्यानच्या २९ गावांचा समावेश करण्यात आला.
त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. थोडक्यात गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. गावांचे अस्तित्व लुप्त होऊ नये म्हणून गावांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कमानी बांधण्याच्या मागण्या होऊ लागल्या. त्यावर पालिका प्रशासनाकडून सकारत्मक पावले उचलत मागील वर्षापासून घणसोली गाव वगळता बहुतांशी गावांच्या कमानीला प्रारंभ झाला व कमानींचे काम पूर्णत्वासही गेले. पूर्णत्वास गेलेल्या कमानीमध्ये आग्रोली गावाच्या कमानीचा देखील समावेश आहे.
आग्रोली गावाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेली कमान पूर्ण बांधून झाली आहे. त्या कमानीवर नवी मुंबई महानगरपालिका असे लिहून एक गाव एक गणपती हे त्या गावाचे सामाजिक वैशिष्ट्य देखील अधोरेखित केले आहे; परंतु ज्या गावाची ओळख पुसू नये म्हणून कमानी बांधण्यात आल्या आहेत. त्या आग्रोली गावचे नाव लिहिण्यास पालिकेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
कमानीवर नाव लावले होते, पण ते खाली पडले आहे. ते नाव पुन्हा लावण्यास सांगितले आहे.-अजय संख्ये, कार्यकारी अभियंता, पालिका.