तलासरी (वार्ताहर) : झाई बोरिगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवण्यात आले, पण ग्रामपंचायतीवर प्रशासक आल्यापासून विकासकामांना खो बसला असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून झाई बोरिगाव गावपाड्यातील रस्त्यावरचे पथदिवे बंद आहेत. वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरू करून पथदिवे सुरू करण्यास ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा कार्यभार सरपंचांकडे असताना रोड लाइट, तसेच पाणीपुरवठ्याचे वीजबिल याची कशीतरी तजविज करून कमिटीकडून ही बिले भरली जायची.
नागरिकांची कामेही वेळेवर व्हायची, पण मुदत संपल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक तसेच ग्रामविस्तार अधिकाऱ्याकडे आला. त्यानंतर झाई बोरिगावच्या नागरिकांच्या गैरसोईला सुरुवात झाली. गावाची विकासकामे थांबली असून ग्रामस्थांची कामेही वेळेवर होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अर्जुन वांगड यांनी केला आहे. ग्रामपंचायत कमिटीतर्फे झाई बोरिगावच्या गावपाड्यांत विविध योजनांतून पथदिवे पुरवण्यात आले आहेत. गावपाड्याच्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.
अनेकदा अपघातही होत असत. पण ग्रामपंचायत कमिटीने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पथदिवे सुरू केले. तथापि, ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासक आल्याने अधिकाऱ्यांच्या मनमानी काम आणि दुर्लक्षामुळे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा सहा महिन्यांपासून खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची पुन्हा गैरसोय सुरू झाली आहे.
सहा महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. विकासकामे रखडली आहेत. ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत.- प्रकाश सांबर,माजी पंचायत समिती सदस्य
ग्रामपंचायतीत मनमानी सुरू असून लोकांची कामे होत नाहीत. दिवाळीपासून रस्त्यांवर अंधार आहे.- अर्जुन वांगड
माजी ग्रामपंचायत सदस्य याबाबत त्वरित माहिती घेण्यात येईल. – निपसे, प्रशासक, झाई बोरिगाव ग्रामपंचायत