मोनिश गायकवाड
भिवंडी : उष्णतेची तीव्रता वाढत असताच ग्रामीण भागासह शहरी भागात मातीच्या मडक्याची मागणीही कमालीची वाढत आहे. मात्र मडक्याची मागणी वाढत असताना त्यांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यातून घशाची तहान भागवण्यासाठी मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढत आहे. भिवंडीत ठिकठिकाणी मातीचे मडके विक्रीसाठी रस्त्याशेजारी दुकाने थाटलेली दिसत आहेत, तर काही विक्रेते डोक्यावर व हातगाडी घेऊन मडक्यांची विक्री करताना दिसत आहेत.
भिवंडीतील कुंभार वाडा, आदर्श पार्क, अनगाव, मुंबई नाशिक मार्गावरसुद्धा विविध आकाराचे मडके विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहेत. उष्णता वाढल्याने चिनी मातीच्या मडक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गेल्या वर्षी ९० ते १३० रुपयांना विक्री होत असलेल्या मातीच्या मडक्यांच्या किमती यावर्षी ५० ते ७० रुपयांनी म्हणजेच १५० ते २५० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून नळ असलेल्या मडक्यांची किंमत थोडी अधिक असल्याचे दिसून येत आहे. लाल व चिनी मातीपासून तयार केलेल्या मातीच्या मडक्यांची मागणी वाढली आहे.
मातीच्या मडक्यांबरोबर भांडी, फुलदाणी, रंगबिरंगी मडके, सुशोभीकरणाच्या वस्तू बनवून त्या मागणीप्रमाणे विक्री केली जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.