
नेरळ (वार्ताहर) : कर्जत शहरातील रिक्षा स्टँडवर सदस्य नसलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास स्थानिक रिक्षाचालकांचा विरोध होता. त्याविरुद्ध १३० रिक्षाचालकांनी ४ एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते व त्यांनतर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी २ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, पनवेल येथील परिवहन अधिकाऱ्यांनी कर्जतमधील सर्व रिक्षा स्टँड खुले करण्याचा आणि कोणीही कुठेही व्यवसाय करू शकतो व दादागिरी करणाऱ्या चालकांवर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
कर्जत शहरात व्यवसाय करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रिक्षाचालक-मालक संघटनेच्या १३० रिक्षाचालकांना शहरातील रिक्षा स्टँडवर व्यवसाय करण्यास स्थानिक रिक्षाचालक विरोध करत होते. त्यामुळे कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करावेत, या मागणीसाठी साधारण वर्षभर सदर संघटना पाठपुरावा करत होती. मात्र प्रशासन उलट याच रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करत असल्याने या संघटनेच्या मंगेश भोईर, संदीप रुठे आणि अरुण रुठे या तीन रिक्षाचालकांनी ४ एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते.
वातावरणात असलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी मंगेश भोईर आणि संदीप रुठे यांची प्रकृती खालावल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर पनवेल येथील आरटीओ अधिकारी श्यामराव कमोद हे कर्जत येथे पोहचले आणि त्यांनी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासोबत चर्चा केली.
शेवटी रात्री उशिरा परिवहन अधिकारी कमोद तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासह उपोषणस्थळी पोहोचले. त्यावेळी परिवहन विभागाचे वतीने कर्जतमधील सर्व रिक्षा स्टँड स्थानिक सर्व रिक्षाधारकांसाठी कायद्याने यापूर्वीही खुले होते आणि कोणताही रिक्षा स्टँड कोणा व्यक्तीच्या किंवा ऑटोरिक्षा संघटनेच्या मालकीचा नाही. त्यामुळे त्या स्टँडला दिलेल्या मान्यताप्राप्त संख्येच्या आधीन राहून कोणीही रिक्षाचालक किंवा परवानाधारक त्याची रिक्षा त्या स्टँडवर उभी करून व्यवसाय करू शकतो.
या संदर्भात कोणत्याही रिक्षा परवानाधारकाने अथवा चालकाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्याबाबत संबंधित पोलीस कार्यालयात तक्रार करावी. तसेच रिक्षा परवानाधारकाकडून परवाना अटी-शर्तीचा भंग झाल्यास त्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.