नेरळ (वार्ताहर) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी ७ एप्रिल रोजी कर्जत आमराई पूल येथे आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांना अटक झाली नाही, तर भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिला. विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जनतेकडून निधी गोळा केला होता.
तो ५८ कोटींचा निधी सोमय्या यांच्याकडून राज्याचे राज्यपालांकडे जमा व्हायला हवा होता, मात्र तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निधी लाटण्यात आला आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे राज्यभर शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत.
आज ७ एप्रिल रोजी कर्जत येथील आमराई पूल येथे आंदोलन करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला पक्षाचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई गायकर, यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’
नवीन पनवेल : आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा पनवेल येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला.
महाडमध्येही निषेध
महाड : देशाचा मानबिंदू असणाऱ्या आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांनी केलेला कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात महाड शिवसेनेकडून गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमय्या यांचा निषेध करून शासनाने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शहरप्रमुख नितीन पावले यांनी केली आहे. यावेळी शहरप्रमुख नितीन पावले यांनी किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी जनतेकडून गोळा केलेल्या पैशांचा हिशोब राज्यपालांकडे दिला नसल्याची माहिती देऊन यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला.
उरणमध्ये शिवसेनेची जोरदार निदर्शने
उरण : आएएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेध करण्यासाठी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा या मागणीसाठी गुरुवार दि. ७ एप्रिल रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.