Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रपोषण पंधरवडा; रायगड अव्वल

पोषण पंधरवडा; रायगड अव्वल

अलिबाग (हिं.स.) : देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या दोन्हीही प्रकारांत रायगड जिल्ह्याने हे यश मिळवलेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

माता आणि बालके सदृढ राहावीत यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण पंधरवडा अभियान २१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात २१ मार्च २०२२ ते २७ मार्च दरम्यान रायगड जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांची वजन व उंची पोषण ट्रॅकर अॅपमध्ये नोंद करण्यात आली. तसेच २८ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत गावपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये पालक मेळावा, माता बैठका, प्रभात फेरी, पोषण रॅली, स्वच्छता मोहीम कार्यक्रम, ऑनलाइन वेबिनार, सायकल रॅली, लसीकरण, किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम, सुपोषण दिवस, बालकांच्या १००० दिवसांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम तसेच गृहभेटी अशा विविध उपक्रमांवर रायगड जिल्ह्यामध्ये भर देऊन पोषण उपक्रम व लोकसहभाग या दोन्ही वर्गवारींमध्ये रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पोषण पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यातील १७ प्रकल्पांमध्ये ३७ लाख उपक्रम राबवत राज्यात उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागातही रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पोषण महाउपक्रम यशस्वी राबवण्यासाठी जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत घेतली.

पोषण पंधरवडा अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिनाभरात जिल्ह्यात ३७ उपक्रम राबवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने लोकसहभागात रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -