पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामदेखील युद्धपातळीवर हातावेगळे करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. ते लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते.
त्यास आता यश मिळाले असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे व संबधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून शिल्लक काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नायगाव पूर्व व पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे. तसेच इंधन, वेळ व पैशांचीही बचत होणार आहे.