
डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अनधिकृत शेड लावले होते. फुटपाथवर कब्जा केलेल्या फेरीवाल्यांनी अनधिकृत शेड बांधले होते. बुधवारी पालिकेचे 'ग' व 'फ' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, पथक प्रमुख अरुण जगताप यांसह पालिकेचे अनधिकृत फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी यांनी डोंबिवली पूर्वेकडील उर्सेकर वाडी, चिमणी गल्ली, मधूबन गल्ली, फडके रोड, स्टेशनबाहेरील परिसरात अनधिकृत शेड हटविले.
ही कारवाई सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली होती. शेड काढू नये म्हणून काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पालिकेच्या पथकाने विरोधाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली होती. स्टेशनबाहेरील रेल्वेपुलाखालीही अनधिकृत शेड काढण्यात आले. पोलीस बंदोबस्त नसतानाही सावंत आणि पथक कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.