डहाणू (वार्ताहर) : मौजे डहाणू आगर येथे सरकारी जमिनीवर झालेली नवीन अतिक्रमणे तसेच अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी समुद्रावर जाणाऱ्या रस्त्यावर दहा फूट खोलीचा चर खोदण्यात आला. तसेच मौजे चिखले सर्वेक्षण नंबर १४ मधील सरकारी जमिनीवर एका फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याने केलेले अतिक्रमण सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या पथकाने धडक कारवाई करून जमीनदोस्त केले.
डहाणू आगर व चिखला येथे सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तहसीलदार अभिजीत देशमुख, मंडळ अधिकारी राजेश निमगुडकर, डहाणू तलाठी संतोष कोटनाके यांच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने धडक कारवाई केली. या केलेल्या कारवाईत मौजे डहाणू आगर येथे सरकारी जमिनीत झालेली नवीन अतिक्रमणे हटवण्यात आली. सदर कारवाई सुरू असताना जेसीबी ठेकेदाराच्या सांगण्याने ड्रायव्हर पळून गेला, तरीदेखील खासगी जेसीबी मागवून कारवाई करण्यात आली.
तसेच अवैध रेती उत्खदनाला आळा घालण्याच्या हेतूने चिखले येथे समुद्रावर जाणाऱ्या रस्त्यावर दहा फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला. त्याचप्रमाणे एका फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याने सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण करवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आले आणि पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यास बजावण्यात आल्याचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी सांगितले.