कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील जामरुख गावातील सोनल शिवाजी कोकणे या विद्यार्थिनीला रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. जामरुख गावातील ही विद्यार्थिनी आपल्या मामाच्या गावी जिते येथे राहत असून कॉलेजवरून परतताना रेल्वे मार्गाने जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीने उडवले. दरम्यान या अपघातानंतर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणा बिघडली होती आणि त्यानंतर तासाने मध्य रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे.
कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असलेली सोनल कोकणे ही तरुणी तालुक्याच्या शेवटच्या गावी राहत असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी परवडणारे नव्हते. त्यामुळे जामरुख येथून ती आपल्या मामाकडे नेरळजवळील जिते गावी राहत होती. जिते येथून कर्जत शहरातील अभिनव प्रशालेच्या उच्च महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी सोनल कर्जत येथून जिते येथे घरी जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी उतरली.
रेल्वे स्थानकात उतरून रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे मार्गाने पाडा गेट येथे नेहमीप्रमाणे जाण्याच्या रस्त्याने सोनल कोकणे चालत जात होती. त्यात आपण कर्जतवरून आलो असून लगेच कोणतीही गाडी येणार नाही या शक्यतेने ती कर्जत-मुंबई या मार्गावरून पाडा गेट येथील रिक्षा स्टँडकडे जात होती. मात्र त्याच सुमारास कर्जत येथून मुंबईकडे जाणारी ७०३२ हैद्राबाद एक्स्प्रेस वेगाने येत होती. त्यावेळी त्या वेगाने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीच्या धडकेत सोनल कोकणेला उडवले आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
हा अपघात झाला आणि त्याच वेळी वांगणी येथे मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली. त्यामुळे झालेला अपघात आणि त्याआधी बंद असलेले रेल्वेफाटक यामुळे परिसरात वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर तासाने नेरळ पाडा गेट येथील फाटक उघडले आणि वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका झाली. तसेच थांबलेली मध्य रेल्वेची वाहतूकही पूर्ववत झाली.