Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपाऊस पडतोय अन् शेतकरी रडतोय...!

पाऊस पडतोय अन् शेतकरी रडतोय…!

संतोष वायंगणकर

आई जेऊ घालीना, बाप भिक मागू देईना अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे. एकिकडे गेल्या दोन-अडीच वर्षांतील कोरोनाचं संकट, लॉकडाऊन या सर्वांमध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय; परंतु ऋतुचक्राच्या बदलामुळे यात सतत शेतकऱ्यांचे अंदाज चुकायला लागलेत आणि कधी नव्हे ते गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे अंदाज मात्र अचूक यायला लागले आहेत. गेल्या आठवड्याभरात कोकणात तीन-चार दिवस पाऊस पडतोय. वर्षभरात बाराही महिने पावसाने हजेरी लावली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोकणातील आंबा, काजू, कोकम, फणस, जांभूळ, करवंद या हातात आहेत, असं वाटणारी सारी फळपिकं या पावसाने हातातून निसटली आहेत. मार्च महिन्यात पाऊस पडल्यावरही आंबा, काजू बागायतदार शेतकरी आशावादी होता की, शेवटचं आंबा पीक तरी हाती येईल; परंतु घडलं ते फार विचित्र घडलं. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पाऊस पुन्हा पडायला लागला. आता मात्र कोकणातील शेतकरी या वारंवार येणाऱ्या ‘अवकाळी’ संकटाने पुरता हैराण झाला आहे. कोकणातील शेतकरी कोणतेही संकट उभे राहिले तरीही त्या संकटावर पाय देऊन उभा राहातो. म्हणूनच तो कधीही आत्महत्येचा विचार करत नाही. राज्यातील शासनाकडून त्यांच्या मनात कोकणासाठी काही द्यायचं झालं तर नेहमीच त्यांच्या हात आखडता असतो. जर राज्य मंत्रिमंडळात वजन असेल तर कोकणसाठी भरीव आर्थिक तरतूद होऊ शकेल. नाही तर कोकणसाठी आश्वासनांची कमी नाही.

कोकणावर आलेल्या अनेक आपत्तींची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना अद्यापही मिळालेली नाही. जर राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांसाठी काही मदत जाहीर केलीच, तर कोकणातील कुणाही गरजू सर्वसामान्याला ती मदत मिळू नये याचीच तरतूद केलेली असते. यामुळे मदतीचे मोठे आकडे जाहीर झालेले असतात; परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील काजू बागायतदारांनी या वर्षी ओले काजूगर शेकड्यांवर दरात बाजारात आणले. गेल्या दोन-पाच वर्षांत ओले काजूगर बाजारात आणले गेले असले तरीही यावर्षी ते प्रमाण थोडे अधिकचे होते. काजू ‘बी’च्या दराची असलेली अस्थिरता आणि काजू ‘बी’ तयार होईपर्यंत होणारी घट, बागायतीतील चोरीचे प्रकार अशा अनेक कारणांनी काजू बागायतदारांच्या हाती फार काही लागत नाही. ओल्या काजूगराचे एक नवे मार्केट काजू बागायतदारांना मिळणारे आहे. यातून ओली काजू ‘बी’ फोडणाऱ्या महिलांच्या हातीही चार पैसे येऊ लागले आहेत. आंबा, काजू असेल किंवा कोणत्याही फळ पिकांच्या माध्यमातून सामान्य गरजूनांही त्याचा फायदा झाला पाहिजे. पूर्वी तर बिनकष्टाची काजू बागायत असायची. फक्त काजूच्या हंगामात काजू ‘बी’ काढण्यापुरताच काजू बागायतदार शेतकऱ्याचा संबंध होता; परंतु आता थोडी स्थिती बदलली आहे. काजू बागायतदारांनी वेंगुर्ले जातीच्या काजू ‘बी’ची लागवड केली आहे. त्यातून काजूचे उत्पादनही वाढले आहे. शेतकऱ्यांच्या हाती चार पैसेही येऊ लागले आहेत. पावसामुळे मात्र काजू ‘बी’वर डाग दिसू लागले आहेत. यामुळे काजू ‘बी’ला अधिकचा दर मिळणे मुश्कील आहे. जी स्थिती काजू ‘बी’ची आहे, त्यापेक्षा फार वेगळी स्थिती आंब्याच्या बाबतीतही घडणार आहे. हवामानात सतत जे बदल घडतात त्याचा परिणाम आंब्यावर होत आहे.

कोकणातील हापूस आंब्याचा जसा स्वाद जगप्रसिद्ध आहे, तसाच हापूस आंब्याचं देखणेपणही सर्वांना भावते. त्याचा पिकल्यानंतरचा एक प्रकारचा वेगळा वास आहे. त्या पिकलेल्या आंब्याच्या घमघमाटाने मन तृप्त होऊन जाते. असं सारं वेगळेपण कोकणातील आंबा, काजूमध्ये आहे. केरळचा काजू आणि कोकणातील काजू यातही मोठा फरक आहे. कोकणातील काजूगराची एक वेगळी टेस्ट आहे. बदलत्या ऋतुचक्रात, हवामानात या सर्वांवर निश्चितच परिणाम होत आहे. एकिकडे कोकणातील आंबा, काजू ही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत असताना पावसाचे हे अचानकपणे संकट उभे राहिले आहे. यातून कोकणातील बागायतदार शेतकरी उभा राहण्यासाठी धडपड करणारच आहे. खरं तर पावसाला मृगनक्षत्रावर जेव्हा सुरुवात होते तेव्हा शेतकरी खूष असतो. याचे कारण पुढच्या वर्षभराची भाताची बेगमी त्याला करायची असते; परंतु या अशा पडणाऱ्या पावसाने मात्र कोकणातील शेतकरी दु:खी, कष्टी झालाय. तो रडतोय. फक्त नेहमीप्रमाणेच तो आपलं बांधावरचं दु:ख घरापर्यंतही येऊ देत नाही. कुणाला दाखवत नाही. कारण त्याला नव्या उमेदीने पुन्हा उभं राहायचं असतं. गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या संकटाशी संघर्ष करणारा कोकणातील शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतोच आहे. सध्या मात्र कोकणात पाऊस पडतोय आणि शेतकरी रडतोय अशी स्थिती आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -